अंबिका नगरातील घटना
शहरातील आझादनगर भागात असलेल्या अंबिका नगरातील रहिवासी तैफुल अहमद रहेमतुल्ला शाह हे परिवारासोबत एका लग्नानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यांचेे घर बंद असल्याने ही संधी साधून चोरट्यांनी बुधवारी रात्री घराला लावलेले कुलूप तोडून घरात प्रवेश केला. संसारोपयोगी साहित्यांचे नुकसान करीत घरात शोधाशोध सुरू केली. काही रोकडसह सोन्याचे आणि चांदीचे दागिने असा हजारो रुपयांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला. चोरट्यांनी आपल्यासोबत घरातील एलईडी टीव्ही देखील लंपास केला आहे. घरात चोरी झाल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला. घटनेची माहिती आझादनगर पोलिसांना कळविण्यात आली. उपनिरीक्षक योगेश ढिकले पथकासह दाखल झाले. श्वान पथकानेही धाव घेतली. दरम्यान, शाह हे बाहेरगावी असल्याने त्यांच्या घरातून नेमका कोणता आणि किती किंमतीचा ऐवज चोरट्याने लांबविला हे ते आल्यानंतर आणि गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर कळू शकेल.
शिवाजी नगरातील घटना
देवपुरातील कल्याणी बंगल्याच्या पाठीमागे असलेल्या शिवाजी नगरातील प्लॉट नंबर ३२ मध्ये घरमालक ए. डी. कलाल आणि त्यांचे भाडेकरी सपना किशनसिंग जाधव या दोघांच्या घरातून चोरट्याने हातसफाई करीत हजारो रुपयांचा ऐवज लांबविला. दोघांचे घर बंद असल्याने चोरट्याने ही संधी साधली. सपना किशनसिंग जाधव यांनी देवपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, त्यांच्या घरातून ३ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या कड्या, ५ हजार ७०० रुपये किमतीचे चांदीचे दागिने असा एकूण ८ हजार ७०० रुपयांचा ऐवज चोरट्याने लांबविला. तसेच घरमालक ए. डी. कलाल यांच्या घरातून ५ हजार रुपये किमतीचे दागिने, ३ हजार ५०० रुपये रोख असा एकूण ८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने लांबविला आहे. या दोन्ही घटनांचा पोलीस तपास करीत आहेत.