धुळे : जिल्ह्यात कोरोना रुग्णांवर उपचारासाठी शहरातील जिल्हा रुग्णालय आणि शहराबाहेरील हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे सर्वोपचार रुग्णालय हे दोन सरकारी दवाखाने महत्त्वाचे ठरले आहेत.
हिरे वैद्यकीय महाविद्यालयात अतिगंभीर रुग्णांवर उपचार केला जातो. या रुग्णालयात रुग्णांची संख्या अधिक असल्याने रुग्णांना काही प्रमाणात उकाड्याचा त्रास सहन करावा लागतो. जिल्हा रुग्णालयात मात्र रुग्णसंख्या कमी असल्याने आणि वाॅर्डदेखील हवेशीर असल्याने उकाड्याचा त्रास नाही. दोन्ही रुग्णालयांमधील ऑक्सिजन बेडसाठी ऑक्सिजनचा पुरवठा मागणीप्रमाणे आहे. ऑक्सिजन बेड वाढविण्याची गरज आहे. दोन्ही रुग्णालयांचा परिसरात विद्युत पुरवठा खंडित होत नाही. अपवादात्मक परिस्थितीत लाईट गेलीच तर जनरेटरची व्यवस्था आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहेत. या सेंटरमध्ये विद्युत पुरवठा खंडित होणार नाही अशा सूचना आहेत. जनरेटरचीदेखील व्यवस्था केली आहे. कोविड सेंटर गावाबाहेर असल्याने हवेशीर आहेत. कोविड सेंटरमध्ये पाणीपुरवठ्याची समस्या असल्याच्या तक्रारी आहेत. प्रशासनातर्फे उपाययोजना केल्या जात आहेत.
एप्रिल तापला
एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. रविवारी ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
मार्च महिन्याच्या शेवटी ३५ ते ३९ अंशादरम्यान तापमानाची नोंद झाली होती.
एप्रिल महिन्यात उन्हाचे चटके असह्य होत असल्याने दुपारी शुकशुकाट असतो. असे असले तरी सध्या ऊन सावलीचा खेळ सुरू असल्याने दिलासा मिळत आहे.
हवेशीर वातावरणामुळे उकाड्याचा त्रास नाही
धुळे जिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये मी गेल्या १५ दिवसांपासून दाखल आहे. वेळेवर उपचार झाल्याने माझी तब्येत सुधारत आहे. या रुग्णालयात रुग्णांमधील अंतर योग्य आहे. तसेच खिडक्यांच्या संख्येनुसार बेडचे प्रमाण असल्याने कोरोना वाॅर्डामध्ये हवा खेळती आहे. प्रत्येक बेडसाखी एक पंखा आहे. त्यामुळे उकाड्याचा त्रास जाणवत नाही. कुलरची आवश्यकता भासत नाही. खिडक्यांमधून हवा येते. - एक रुग्ण
प्रत्येक बेडजवळ एक मोठी खिडकी आहे. केवळ दुपारच्या वेळी उन्हाच्या झळा लागू नयेत म्हणून खिडक्या बंद असतात. सकाळी आणि सायंकाळनंतर मात्र खिडक्या उघड्या असतात. त्यामुळे हवेशीर वातावरण आहे. रुग्णालयाच्या परिसरामध्ये लाईट जात नाही म्हणून जनरेटरची गरज नाही. शिवाय रुग्णांच्या विरंगुळ्यासाठी कोरोना वॉर्डात टीव्ही आणि एफएमसुध्दा आहे. त्यामुळे रुग्णालयातील वातावरण प्रसन्न आहे. - दुसरा रुग्ण.