धुळे : भाडेतत्वावर दिलेल्या शहरातील काँग्रेस भवनाचा करार संपुष्टात आल्याने त्याचा ताबा घ्यावा असा आदेश स्थायी समितीच्या बैठकीत गुरुवारी सभापती सुनील बैसाणे यांनी दिला. करार संपुष्टात आलेल्या शहरातील अशा एकूण १९७ जागा आहेत. त्या सर्वांचा ताबा घेण्याचेही आदेशात म्हटले आहे. दरम्यान, काँग्रेस भवन हे महापालिकेच्या जागेवर नसून शासनाच्या भाडेपट्टी करारानुसार आम्हाला ती जागा मिळाली असल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांनी म्हटले आहे.गुरुवारी मनपाच्या सभागृहात सभापती सुनील बैसाणे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची बैठक झाली. बैठकीत, शहरातील भाडेपट्टी करारावर दिलेल्या जागांची मुदत संपल्याने मनपाचा महसूल बुडत आहे. तरी त्या जागा मनपाने ताब्यात घ्याव्यात. अशी मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक कमलेश देवरे यांनी केली होती. त्यानुसार, शहरातील १९७ जागांचा भाडेपट्टी करार संपला असून त्यांना नोेटीसा बजाविण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून अद्याप कोणत्याही प्रकारचे उत्तर आले नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. त्यानंतर सभापती यांनी १९७ जागांचा ताबा घेण्याचे आदेश दिले. त्यावेळी या जागांमध्ये काँग्रेस भवनाची जागा असल्याचे समोर आले. तेव्हा सभापती यांनी मुदत संपली असल्याने सर्व जागांसह काँग्रेस भवनही ताब्यात घेण्यात यावे, त्यात काही अडचणी येत असल्यास मी स्वत: त्या ठिकाणी उपस्थित राहील असेही सभापती बैसाणे यांनी सांगितले.दरम्यान, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांनी जर, महापालिकेला जागा खाली करण्याची हौस असेल तर काँग्रेस कमिटीच्या जागेवरती असलेले भाजपचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या वडिलांच्या नावावर असलेल्या रामराव सिताराम पाटील को-आॅपरेटीव्ह बँकेचे अतिक्रमण काढावे असे त्यांनी सांगितले.
धुळ्यातील काँग्रेस भवनाची मुदत संपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 22:18 IST