शिरपूर : ‘सुखकर्ता, दु:खहर्ता वार्ता विघ्नाची’ असे आरतीचे स्वर कानावर पडू लागले की, सर्व भक्तांचा लाडका गणपतीबाप्पा घरोघरी विराजमान होणार आहे़ वर्षभर ज्याची आतुरतेने वाट पाहिली जाते, त्या बाप्पाचे लवकरच आगमन होणार असून त्याच्या स्वागतासाठी भाविक आतुर झाले आहेत़ या वर्षी थर्माकोल, प्लास्टिक वापरावर बंदी असल्याने त्याला पर्यायी अशा सजावटीच्या वस्तू बाजारात आल्या आहेत़ अशा विविध वस्तूंनी बाजारपेठ सजली आहे़ मूर्तीसाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्यापासून मखर, सजावटीचे साहित्य तसेच पूजेच्या साहित्यावरही जीएसटी लागू केल्याने ग्राहकांच्या खिशाला चांगलीच कात्री बसली आहे़
गेल्या दीड वर्षापासून विविध सणांवर कोरोनाचे सावट आहे. मांगल्याचे प्रतीक असलेला सर्वांचा गणपती बाप्पा देखील त्यातून सुटला नाही. गणेशोत्सव साध्या पद्धतीने केला जाणार असला तरी त्याची पूर्वतयारी मात्र यंदाही तेवढ्याच दिमाखात सुरू आहे. येत्या शुक्रवारी गणरायाची स्थापना होणार आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेसह करवंद नाका परिसरात गणरायाच्या मूर्तींची दुकाने थाटली आहेत़ त्याठिकाणी गणेश भक्तांची खरेदीसाठी लगबग कायम आहे.
सर्वांच्या लाडक्या गणरायाचे आगमन अवघ्या दोन दिवसांवर आले असून बाप्पाच्या स्वागतासाठी बाजारपेठेत जोरदार खरेदी केली जात आहे. यासाठी ठिकठिकाणी दुकाने थाटण्यात आली असून खरेदीसाठी गणेशभक्तांची या दुकानांकडे वळत आहे. बाप्पाच्या आगमनासाठी बाजारपेठ सजली असून मूर्ती व इतर साहित्यांच्या विक्रीसाठी करवंद नाका परिसरात स्टॉल थाटण्यात आले असून ग्राहकांकडूनही जोरदार खरेदी केली जात आहे. यंदाचा गणेशोत्सव कोरोनाच्या सावटात होत आहे. गणपतीच्या दहा दिवसांतील उत्साहावर कोरोनाची काळी छाया असली तरी भाविकांच्या उत्साहाला उधाण आले आहे. गर्दी टाळून साध्या पद्धतीने हा सोहळा होणार आहे.
शहरातील प्रमुख मंडळांनी छोटे मंडप, मिरवणुका न काढण्याचे ठरवले आहे. तसेच आरती करताना किंवा पूजा करताना देखील शारीरिक अंतर आणि प्रशासनाचे नियम पाळण्यात येणार असल्याचे मंडळांच्या वतीने सांगण्यात आले. अनेक मंडळांचे मंडप तयार झाले असून पदाधिकारी, कार्यकर्ते रात्रंदिवस काम करताना दिसत आहे.
शहरात चौका-चौकांत अनेक ठिकाणी लहान, मोठ्या मंडळांकडून गणपतीची स्थापना केली जाते. दरवर्षी उत्साहात बाप्पाचे आगमन होते. त्यानंतर दहा दिवस उत्साहात गणरायाची मनोभावे सेवा आणि पूजा केली जाते. मात्र गेल्या दीड-दोन वर्षापासून कोरोनाच्या सावटात हा सोहळा होत आहे. या मंडळांतर्फे गेल्या काही दिवसांपासून यंदा साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याची तयारी सुरू होती. त्याला आता मूर्त रूप आले आहे. यंदा घरचा गणपती देखील साध्या पद्धतीनेच साजरा केला जाणार आहे.
बहुतांश मंडळातर्फे यंदा कोणतीही मिरवणूक काढली जाणार नाही. प्रशासनाच्या नियमांचे पालन केले जाणार आहे. मंडळाने लहान आकाराचा मंडप टाकला आहे. या ठिकाणी गणपती स्थापनेच्या वेळी मंचावर फक्त तीनच जण असतील. त्यासोबतच मंडपात असलेल्या मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत गणरायाची स्थापना केली जाणार आहे.
एसपींचे आवाहऩ़़
सर्वात लाडका असलेला सण येत्या १० तारखेपासून महाराष्ट्रात सर्वत्र गणपती उत्सव सुरू होत आहे़ मात्र गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही कोरोना नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करावयाचा आहे़ कोरोनाच्या २ लाटा आधीच येऊन गेल्या आहेत, तिसल्या लाटेचे संकेत देण्यात आले आहेत़ त्याप्रमाणे शासनाच्या आदेशानुसार अंत्यत साधेपणाने उत्सव साजरा करा, कोणत्याही प्रकारच्या मिरवणुकीला परवानगी दिली जाणार नाही, गणपतीच्या मूर्तीची उंची ४ फुटांपेक्षा अधिक नको, सार्वजनिक ठिकाणी गर्दी व्हायला नको, सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे आहे, आणि शक्यतो अधिकाधिक घरगुती गणपती साजरा करण्यावर भर द्यावा़
-चिन्मय पंडित,
जिल्हा पोलीस अधीक्षक
फोटो- मेलवर/फाईल पहाणे