आंदोलनाची दखल घेऊन समाजकल्याण आयुक्त डाॅ. प्रशांत नारनवरे यांनी हर्षदा बडगुजर यांच्याकडे सहायक आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला. हर्षदा बडगुजर यांनी २ जानेवारीला मागण्यांबाबत आढावा बैठक घेतली. रमाई घरकूल योजने अंतर्गत लाभार्थी आणि सहायक आयुक्त समाजकल्याण यांचे संयुक्त बँक खाते उघडण्यासाठी नवीन सहीचा नमुना राष्ट्रीयीकृत बँकेत देण्यात आला आहे. त्यामुळे आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती हर्षदा बडगुजर यांनी केली होती. त्यानुसार सोमवारी आंदोलन मागे घेण्यात आले. मागण्या मान्य झाल्याने फटक्यांची आतषबाजी करून आंदोलकांनी आनंद व्यक्त केला.
तसेच महानगरपालिकेच्या हद्दवाढीतील गावांमधील लाभार्थ्यांच्या नमुना क्रमांक ८ अ हा घराचा उतारा ग्राह्य धरून रमाई घरकुलाचा लाभ दिला नाही तर महानगरपालिकेच्या आवारात बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दलितमित्र वाल्मीक दामोदर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळातील बाबूराव नेरकर, शशिकांत वाघ, देवीदास जगताप, भिवसन अहिरे, सागर ढिवरे, माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाठ, तापीराम आखाडे, अशोक लोंढे, मणीबाबा खैरनार, रोहिदास नगराळे, शोभा शिरसाठ, अनिता बैसाणे, भटू वाघ, शकुंतला शिंदे, बद्रीनाथ पवार यांच्यासह शेकडो लाभार्थी महिला, पुरुषांचे आंदोलन तब्बल ४९ दिवसांपासून सुरु होते.