महाविद्यालयाच्या रासेयो विभागामार्फत कोविड विषाणूच्या प्रतिबंधात्मक लसीकरणाविषयी व रक्तदानाबद्दल रासेयो स्वयंसेवक हे घरोघरी जाऊन जनजागृती करत आहेत. मागील काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती आणखीच बिकट आहे. त्यामुळे कोरोना विषाणूला हरविण्यासाठी व्यापक प्रमाणात लसीकरण होणे आवश्यक आहे. मात्र, अजूनही लसीकरणाला हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याच्या आणि राज्यातील रक्तटंचाई या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासन व रासेयो विभाग यांच्या आवाहनास प्रतिसाद देण्यात आला.
प्राचार्य डॉ. डी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना प्रतिबंधक लसीकरणाविषयी जनजागृती कार्यक्रम रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. गोपाल बिडे यांच्याकडून आयोजित करण्यात आला. सर्वसामान्य जनतेच्या लसीकरणाविषयीचे मनातील संभ्रम दूर करण्याकरिता रासेयो स्वयंसेवक हे घरोघरी जात व कोरोना नियम पाळत कोविड विषाणूच्या प्रतिबंधात्मक लसीकरणाविषयी जनजागृती करीत आहेत. त्यात अनिता धनगर, सत्यजित महाजन, गौतम पवार, शुभांगी पाटील, विशाखा राजपूत, हर्षल भोई, रोशन पवार, प्रीतम माळी, श्रीधर पाटील, आकाश भोई, राजेश राठोड, राहुल हजारे, वर्षा पाटील यांनी आपआपल्या गावात व शिरपूरमधील भागामंध्ये घरोघरी जाऊन कोरोना लसीचे फायदे, गैरसमज व लसीमुळे येणाऱ्या पुढील लाटेला टाळू शकतो़ याद्वारे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करू शकतो तसेच १ मे पासून राज्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेचा महत्त्वपूर्ण टप्पा सुरू झाला आहे. १ मेपासून १८ वर्षांपुढील सर्वजणांना लस घेता येत आहे, पण लस घेतल्यानंतर पुढील ६० दिवस रक्तदान करता येणार नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात राज्यात रक्त टंचाई टाळण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीची मात्रा घेण्यापूर्वी रक्तदान जरूर करावे, असे आवाहन स्वयंसेवक करीत आहेत.
रासेयो स्वयंसेवकांचे प्राचार्य डॉ. डी. आर. पाटील, उपप्राचार्य डॉ. ए़ एम. पाटील, उपप्राचार्य डॉ. आर. डी. जाधव यांनी कौतुक केले. याकामी रासेयो कार्यक्रम अधिकारी गोपाल बिडे, सहायक प्रा. आर. पी. महाजन, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. अनिता जाधव हे परिश्रम घेत आहेत़