धुळे : येथील ४८ महाराष्ट्र बटालियन एनसीसीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता पंधरवाड्या अंतर्गत समादेशक अधिकारी कर्नल बी. व्ही. एस. शिवा राव यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता विषयक विविध उपक्रम राबविण्यात येत असून सोमवारी मोठ्या प्रमाणात पांझरा नदी पात्रात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. एनसीसीच्या वतीने संविधान दिवस व एनसीसीच्या ७२ व्या वर्धापन दिनाच्या औचित्याने देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. एनसीसीच्या ४८ महाराष्ट्र बटालियनच्या क्षेत्रातील विविध शाळा व महाविद्यालयातील छात्रसैनिक स्वच्छता विषयक उपक्रमात हिरीरीने भाग घेत आहेत. गाव, शहरातील पानवठे, तळे, नदीपात्र यांची स्वच्छता करीत आहेत. याशिवाय चित्रकला, निबंध, रांगोळी, घोषवाक्य स्पर्धा तसेच पथनाट्य व रॅलीच्या माध्यमातून स्वच्छतेचा जागर छात्रसैनिक समाजात करीत आहेत.या मोहिमे अंतर्गत धुळे शहरातील पांझरा नदी पात्राची दोन टप्यात स्वच्छता करण्यात आली असून, गणपतीपुल ते लहान पुलाच्या मधील नदीपात्रातील प्लास्टीक, धार्मिक निर्माल्य, काटेरी झूडपे व इतर घाण कचरा काढून स्वच्छता करण्यात आली. कोरानाच्या पार्श्वभूमिवर मास्क व सॅनिटायझरचा वापर करीत खबरदारी बाळगत हा उपक्रम राबविण्यात येत आहे.या मोहिमेत शहरातील एसएसव्हीपीएस साहित्य आणि वाणिज्य महाविद्यालय, विद्यावर्धिनी, झेड. बी. पाटील, डॉ. पा. रा. घोगरे महाविद्यालयातील सुमारे १५० छात्रसैनिकांनी भाग घेतला.मोहिमेच्या यशस्वीते करीता कॅप्टन डॉ. के. एम. बोरसे, कॅप्टन के. जी. बोरसे, कॅप्टन डॉ. महेंद्रकुमार वाढे, लेफ्टनंट डॉ. शशिकांत खलाणे, लेफ्टनंट डॉ. सुनिल पाटील, लेफ्टनंट क्रांती पाटील, सुभेदार मेजर गुरमितसिंग, बटालियन हवालदार मेजर गजापती गावडे, हवालदार राजिंदरकुमार यांनी परीश्रम घेतले. मोहिमेकरीता एनसीसीच्या ४८ बटालियनचे प्रशासकिय अधिकारी कर्नल जगमित सिंग व धुळे महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाचे सहकार्य लाभले.
छात्रसैनिकांनी केली पांझरा नदी स्वच्छ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 22:06 IST