धुळे : पावसाळ्याच्या आधी देखभाल-दुरुस्तीची आवश्यक कामे पूर्ण करण्याच्या सूचना आपत्ती व्यवस्थापन विभागाने विविध विभागांना दिल्या आहेत. त्यानुसार पाटबंधारे, सार्वजिनक बांधकाम, महानगरपालिका, टेलिफोन विभागाने कामे सुरू केली आहेत. महावितरण कंपनीची कामे सध्या जोरात सुरू असल्याने वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे.
पावसाळ्यात वीज कंपनीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. वादळी पाऊस झाल्यावर काही ठिकाणी वीज वाहिन्यांवर वृक्ष उन्मळून पडतात. पोल वाकतात. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होतो. तसे हाेऊ नये यासाठी वीज कंपनीतर्फे देखभाल दुरुस्तीच्या कामांना वेग देण्यात आला आहे. वीज कंपनीच्या जिल्ह्यातील तिन्ही विभागांतर्फे देखभाल सुरू झाली आहे. काही कामांसाठी आगाऊ निविदा काढण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात वीज ग्राहकांना अखंडित व योग्य दाबाने वीज पुरवठा व्हावा यासाठी आतापासून प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार रोहित्राची तपासणी, अर्थिंग व टर्मिनल कनेक्शन चेक करणे, ऑइलची पातळी तपासणी, फिडर पिलरची दुरुस्ती करणे, वीज वाहिन्यांना धोकादायक ठरणाऱ्या वृक्षांच्या फांद्या तोडणे, डिस्ट्रिब्युशन बॉक्समधील फ्यूज बदलणे, खांब आणि तारांचे मजबुतीकरण करणे, गंजलेले विजेचे खांब बदलणे, वीज तारांमध्ये स्पेसर्स बसवणे, स्टेवायरने वीज खांबांचा आधार मजबूत करणे, फुटलेले इन्सुलेटर बदलणे, तारा बदलणे किंवा झोल काढणे, जुन्या फीडर पिलरमध्ये इन्सुलेशन स्प्रे मारणे तसेच पावसाचे पाणी साचणाऱ्या परिसरातील फिडर पिलरची जमिनीपासून उंची वाढवणे आदी कामे करण्यात येत आहेत. पॉवर ट्रान्सफॉर्मरच्या तेलाची पातळी तपासणे, ऑइल टॉपअप करणे, बॅटरी सुस्थितीत ठेवणे आदी कामांना प्राधान्य देण्यात आले आहे.
शहरातील विविध भागांत वीज कंपनीतर्फे दुरुस्तीची कामे सुरू आहेत. ३३ केव्ही कृषी महाविद्यालय, ३३ केव्ही गोंदूर फिडर, ३३ केव्ही फागणे फिडर, ११ केव्ही सिव्हिल फिडर, ११ केव्ही दत्तमंदिर फिडर अंतर्गत येणाऱ्या परिसरांमध्ये दुरुस्तीची कामे करण्यात आली. उर्वरित भागातील कामेदेखील युद्धपातळीवर सुरू आहेत. शनिवारच्या दिवशी विद्युत पुरवठा खंडित करून दुरुस्तीच्या कामांना प्राधान्य दिले जाते.