शिरपूर : देशासह राज्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव वाढत आहे, त्याची खबरदारी म्हणून संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे़ तसेच नागरिकांना सोशन डिस्टन्सिंगच्या सूचना दिल्या आहेत़ त्यामुळे आता तालुक्यातील ग्रामीण भागात सुध्दा सोशल डिस्टन्सिंग ठेवूनच शेतातील कामे केली जात आहेत़कोरोना या महामारीने संपूर्ण जगात थैमान घातले आहे़ हा आजार संसर्गातून होत असल्याने यावर शासनाने नागरिकांच्या ऐकमेकांशी होणारा संपर्क टाळण्यासाठी कठोर पाऊले उचलीत आहेत़ देशात सर्वत्र संचारबंदी लागू केली आहे़ अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व अस्थापना बंद ठेवण्यात आल्या आहेत़तालुक्यात गहु, हरबरा, दादर, बाजरी काढणी तसेच ऊसाची खुरपणी या शेतातील कामांनी डोके वर काढले आहे़ मात्र शेतातील उभ्या पिकांचे नुकसान होत आहे़ कोरोनाच्या भीतीपोटी देखील मजूर कामाला यायला तयार होत नव्हती़ मात्र १० दिवस लॉकडाऊनची होत आल्यामुळे मजुरांवर उपासमारीची पाळी होवू घातली आहे़ कामावर न जाता मजूर आपल्या परिसरात गर्दी करीत होती़ त्यातून आरोग्याचा प्रश्न अजून वाढत होता़ ही बाब काही शेतकऱ्यांच्या लक्षात आली़ त्या शेतकऱ्यांनी मजूरांना घरी बसून एकत्र थांबण्यापेक्षा शेतात येवून सुरक्षित अंतर ठेवून काम करा़ यातून तुमच्याही कुटुंबाला दोन पैसे मिळतील आणि आमच्याही हाता तोंडाशी आलेला घास आम्हाला मिळेल असे सांगून कामावर येण्याबाबत मजुरांना आवाहन केले़शेतमालकाने सुध्दा मजुरांना काळजी घेण्याचे आश्वासन देवून त्यांना सॅनिटायझर व तोंड झाकण्यासाठी स्कार्फ उपलब्ध करून दिलेत़ सर्वात महत्वाचे म्हणजे शासनाच्या सूचनेनुसार सोशल डिस्टन्स ठेवूनच काम केले जात आहे़
शेतातही होताहेत सोशल डिस्टन्सिंगने कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 13:32 IST