कापडणे : गेल्या दीड महिन्यापासून धुळे जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभाग व सर फाऊंडेशन धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने श्यामची आई कथा अभिवाचन उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. या उपक्रमात धुळे, साक्री, शिरपूर व शिंदखेडा या चारही तालुक्यातील शिक्षक, शिक्षिकांनी सहभाग घेतला होता. या ऑडिबल कथांना जिल्ह्यातूनच नव्हे तर संपूर्ण राज्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हा अतिशय स्तुत्य उपक्रम ठरला, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुषार रंधे यांनी केले.
श्यामची कथा अभिवाचन उपक्रमाचा नुकताच धुळे येथे जिल्हा परिषदेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात समारोप झाला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, शिक्षण समिती सभापती मंगला पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., शिक्षणाधिकारी मनीष पवार, शिक्षणाधिकारी निर्मल, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याते जी. एस. पाटील, गटशिक्षणाधिकारी सुरेखा देवरे, सी. के. पाटील पवार उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ललिता देसले, अविनाश पाटील व चित्रा पवार यांनी केले. या उपक्रमाचे यशस्वी संयोजन केले म्हणून या उपक्रमाचे संयोजक सुनील मोरे यांचा मान्यवरांनी सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
सर फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक सुनील मोरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तद्नंतर उपस्थित अभिवाचकांना सन्मानपत्र, गुलाबपुष्प व ग्रंथ देऊन सन्मानित करण्यात आले.
त्यानंतर प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित अभिवाचकांमधून डाॅ. नीता सोनवणे, अविनाश सोनार व सराफ यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या शेवटी धुळे शहर समन्वयक सुधर्मा सोनवणे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अविनाश खैरनार, हेमलता पाटील, संगीता शिंदे, ललिता देसले, चित्रा पवार, सुनीता गायकवाड, गोकूळ पाटील, राकेश जाधव, जितेंद्र भदाणे, अविनाश पाटील या समन्वयकांनी परिश्रम घेतले.