निजामपूर/मालपूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी निजामपूर येथील श्री हाटकेश्वर महादेव आणि मालपूर येथील ग्रामदैवत व्याघ्रंबरी देवी यात्रोत्सव यंदा रद्द करण्यात आला आहे. ऐरवी यात्रेच्या वेळी गजबजलेला मंदिराचा परिसरात यंदा शुकशुकाट दिसून येत आहे.निजामपूर - दरवर्षी अत्यंत उत्साहात साजरा होणारा श्री हाटकेश्वर जयंती उत्सव यंदा थांबविण्याचा निर्णय झाल्याने सकाळी केवळ आरती करण्यात आली येथील समस्त दशा नागर गुजराथी समाजाचे कुल दैवत असलेल्या श्री हाटकेश्वर महादेवाचे निजामपूर येथे नागर वाडीत पुरातन मंदिर आहे.दरवर्षी चैत्र शुद्ध १४ ला नागर वाडीत मोठ्या उत्साहात जयंती उत्सव साजरा होतो. मात्र यंदा कोरोना बाबत खबरदारी साठी संचारबंदी असल्याने उत्सव थांबविण्याचा ट्रस्टतर्फे निर्णय झाला होता. मंगळवारी सकाळी अकरा वाजता डॉ कृष्णकांत शाह यांनी पूजा व महाआरती केली. आरती समाजाचे सचिव प्रमोदचंद्र शाह यांनी म्हटली. गर्भगृहाबाहेर अजितचंद्र शाह, राजेंद्र बिहारीलाल शाह, नितीन शाह, शामुभाई शाह हे अंतर ठेवून आरतीसाठी उभे होते. सर्व समाज बांधवांना आरतीसाठी येऊ नये असे सूचित करण्यात आले होते.समाजात प्रसाद घरोघरी पोहोचविण्यात आला.मालपूर - चैत्र शुद्ध चावदस हा मालपूर ता. शिंदखेडा येथील ग्रामदैवत व्याघ्रंबरी देवी मातेचा यात्रा उत्सवाचा दिवस. चावदस व पौर्णिमा असा दोन दिवस येथील गावाचा यात्रा उत्सव भरत असतो. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा यात्रा उत्सव रद्द करण्यात आला. असून ग्रामदैवत व्याघ्रंबरी माता मंदिर परिसरात मंगळवारी शुकशुकाट दिसून आला.यात्रेत महाराष्ट, गुजरात, मध्यप्रदेश येथून भाविक नवस आणि जाऊळ उतरविण्यासाठी येत असतात. सोमवारी सायंकाळी मंदिराचा परिसर स्वच्छ करण्यात आला. मंगळवारी भल्या पहाटे पुजारी शरद उपासनी यांनी देवीची खोळ भरुन विधीवत पूजा करुन महाआरती केली. दुपारी पुरणपोळीचे नैवेद्य व ६२ दिव्यांची आरती देखील केली.दुपारी गावात कुलभक्तांनी घरोघरी ६२ दिव्यांची आरती लावुन मनोकामना केली तसेच देशावरील हे कोरोना संकट हटवण्याचे साकडे देवीला घातल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
श्री हाटकेश्वर महादेव आणि व्याघ्रंबरी देवी यात्रा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 13:03 IST