धुळे : तालुक्यातील शिरुड गावात सेंट्रल बँकेचे एटीएम चोरट्यांनी उचलून पोबारा केल्याची घटना शनिवारी पहाटे अडीच ते तीन वाजेच्या सुमारास घडली़ याच ठिकाणी चोरट्यांनी साधारण पाच महिन्यांपुर्वी एटीएम चोरण्याचा प्रयत्न केला होता़ ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे चोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला होता़धुळे तालुक्यातील शिरुड गावातील गाव दरवाज्यासमोरच सेंट्रल बँकेचे एटीएम मशिन आहे़ यात शुक्रवारीच पैसे भरण्यात आल्याचे सांगण्यात आले़ त्याचा फायदा चोरट्यांनी उचलला असावा अंदाज आहे़ शनिवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास एका पिकअप वाहन घेऊन ४ ते ५ चोरटे एटीएम मशिनजवळ आले़ मशिन जमिनीपासून वेगळे करण्यात आले़ मशिन बाहेर निघत नसल्याने रुमचा काच फोडण्यात आला़ अक्षरश: तोडफोड करण्यात आली़ चोरट्यांनी मशिनच फोडण्याचा प्रयत्न न करता थेट मशिनच उचलून पळून गेले़ ही बाब कोणाच्याही लक्षात आली नाही़ पहाटेच्या सुमारास सोशल मिडीयाच्या माध्यमातून चोरी झाल्याचा मॅसेज फिरला तेव्हा ही बाब गांभिर्याने घेण्यात आली़ घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत, धुळे तालुका पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली़ त्यापाठोपाठ फॉरेन्सिक लॅबचे पथकही घटनास्थळी दाखल झाले़ या मशिनमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चोरट्यांची छबी आली आहे़ हे सर्व फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़ सकाळी सव्वा अकरा वाजेपर्यंत धुळे तालुका पोलीस ठाण्यात केवळ प्राथमिक नोंद करण्यात आली आहे़ अजूनपर्यंत फिर्याद दाखल झालेली नव्हती़ घटनेची चर्चा मात्र गावात मोठ्या प्रमाणावर सुरु आहे़
शिरुडला सेंट्रल बँकेचे एटीएम चोरुन नेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 11:15 IST