साक्री- माझी वसुंधरा अभियान अंतर्गत मौजे आमोदे येथील वनविभागाच्या संरक्षित जमिनीवर गुरुवारी(दि. १६ रोजी) म्हसाळे येथील शाळकरी विद्यार्थ्यांनी सुमारे पाच हजार विविध प्रजातींच्या वृक्षांचे बीजारोपण केले. शाळकरी विद्यार्थ्यांनी या उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या कृतीतून इतरांपुढे आदर्श उभा केला आहे.
जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पवार यांच्या संकल्पनेतून तसेच साक्रीचे गटविकास अधिकारी जगन सूर्यवंशी वनसंरक्षक अधिकारी के. एन. सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसाळे ग्रामपंचायतीने हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला. उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पवार यांनी या उपक्रमस्थळी भेट देऊन समाधान व्यक्त केले. तसेच शाळकरी मुलांच्या कामगिरीबद्दल कौतुकही केले.
जिल्ह्यात माझी वसुंधरा अभियान टप्पा दोनची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्या अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येतात. जिल्ह्यात यावर्षी ३२ गावांची निवड करण्यात आली असून यामध्ये साक्री तालुक्यातील म्हसाळे ग्रामपंचायतीचा समावेश आहे. माझी वसुंधरा अभियानांतर्गत म्हसाळे ग्रामपंचायतीच्या वतीने वसुंधरेच्या संवर्धनासाठी नानाविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत म्हसाळे (ता. साक्री )येथील श्री गुरुदत्त माध्यमिक विद्यालय आणि जिल्हा परिषद केंद्र शाळा येथील शाळकरी मुलांनी आज वसुंधरेच्या संवर्धन आणि रक्षणासाठी योगदान दिले. वनविभागाच्या साक्री तालुक्यातील मौजे अमोदे येथील संरक्षित जमिनीवर शाळकरी मुलांनी विविध प्रजातींची सुमारे पाच हजार वृक्षांची बीजारोपण केले. यामध्ये चिंच, अंजन , शिसव, बांबू, गुलमोहर, करंज, खैर, काशीद, विलायची चिंच आदी वृक्षांच्या बीजाचे रोपण करण्यात आले. सुमारे ७० शाळकरी मुलांनी यात सक्रिय सहभाग नोंदविला. बीजारोपण करताना मुलांच्या चेहऱ्यावर विशेष आनंद आणि समाधान जाणवत होते. या उपक्रमाच्या माध्यमातून लहान मुलांपर्यंत वृक्षसंवर्धनाचा संदेश पोहोचण्यास मदत मिळाली. याप्रसंगी मुलांनी हरित शपथ घेऊन वृक्षारोपण संरक्षण आणि वृक्ष संवर्धनाचा संकल्प देखील केला. तसेच यावेळी शाळकरी मुलांनी वनभोजनाचा आनंदही घेतला. जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पवार यांच्या संकल्पनेतून हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. यासाठी साक्री पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जगन सूर्यवंशी, वनसंरक्षक अधिकारी के. एन. सोनवणे विस्ताराधिकारी जे. पी. खाडे, वनरक्षक एस. आर. मुंडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पवार यांनी या उपक्रमस्थळी भेट देऊन समाधान व्यक्त केले. तसेच शाळकरी मुलांच्या कामगिरीबद्दल कौतुकही केले. यावेळी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील संवाद तज्ज्ञ संतोष नेरकर, क्षमता बांधणी तज्ज्ञ मनोज जगताप उपस्थित होते. उपक्रम यशस्वीतेसाठी म्हसाळे ग्रामसेवक शरद वाघ, मुख्याध्यापक डी. एस. हिरे, मुख्याध्यापक खैरनार, भागाबाई सोनवणे, गुलाब माळी, भिका बोढरे, सजन माळी, वना जाधव, उमाजी पवार, दीपक आखाडे, प्रल्हाद बेडसे, हेमंत चव्हाण, ए. एन. मलिक, दासभाऊ मोरे यांनी परिश्रम घेतले.