मालपूर धावडे ग्रामीण मार्ग क्रमांक ९६ साठी सक्षम अधिकाऱ्यांनी प्रस्तावित निविदा मंजूर केली असून, यामुळे यावर खडी मुरुमाचे काम होऊन शेतशिवारात, तसेच नजीकच्या गटातील धावडे गाव गाठण्यासाठी सोयीचा होणार आहे. या रस्त्याच्या काम मार्गी लावण्यासाठी माजी सरपंच हेमराज पाटील यांनी प्रयत्न केल्याचे त्यांनी नमूद केले
मालपूर परिसरातील ग्रामीण रस्ताची चाळण झालेली आहे. सर्वच रस्त्याची डागडुजी, खड्ड्यांचा भराव, तसेच काही रस्त्यांवर नवीन अस्तरीकरण करणे गरजेचे झाले आहे. मात्र, याला केव्हा मुहूर्त सापडेल, हे जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम प्रशासनावर अवलंबून आहे. त्यांचे येथे दुर्लक्ष होत असून, मालपूर गटाच्या जिल्हा परिषद सदस्या चंद्रकला हेमराज पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने मालपूर चुडाणे, तसेच मालपूर धावडे या ग्रामीण रस्त्याच्या दुरुस्तीसाठी स्वतंत्र सुमारे १४ लक्ष रुपयांच्या कृती आराखड्याला मागणीनुसार सक्षम अधिकाऱ्यांनी नुकतीच मंजुरी दिली आहे. यामुळे येथे समाधानाचे वातावरण आहे.
मालपूर वैदांणे, भटाई विहीर, माडळ रोड या रस्त्याचीही दुर्दशा झालेली दिसून येत आहे. येथे रस्त्याची दुर्दशा झाल्यामुळे किरकोळ अपघात नित्याचेच ठरलेले आहेत, खड्डा चुकविण्याच्या नादात दुचाकी घसरून अपघात होतात, यासाठी सर्वच ग्रामीण रस्त्याचे काम मार्गी लागणे या परिसरासाठी गरजेचे आहे. मालपूर ही परिसरातील मोठी बाजारपेठ असून, आजूबाजूच्या या खेड्यापाड्यातील नागरिक दररोज मालपूर गावी मोठ्या संख्येने येत असतात. यामुळे या रस्त्यावर नेहमीच वर्दळीचे वातावरण दिसते.
मालपूर हे मुख्य केंद्र असून, त्याला दोन जिल्हा परिषद गटातील गावे जोडण्यात आलेली आहेत. यामुळे रस्ता चांगला असेल, तर प्रवास सोयीचा होतो. या कामी सर्वच रस्त्याचे प्रस्ताव जिल्हा परिषद शासन दरबारी आपण प्रस्तावित केलेले आहेत. यासाठी विकासाचा दृष्टिकोन ठेवून सर्वसामान्यांना मूलभूत अधिकार मिळवून देण्याचे प्रत्येक लोकप्रतिनिधींचे ते काम असते. मात्र, मलाच फोन करावा, असा काहींचा अट्टाहास असल्याची खरमरीत टीका हेमराज पाटलांनी यावेळी त्यांच्या विरोधकांवर केली.