धुळे : कोरोनामुळे रेशनकार्डधारक पात्र लाभार्थींना केंद्र शासनातर्फे नियमित धान्यासह तेवढेच धान्य मोफत दिले जात आहे. जास्तीचे धान्य मिळत असल्याने लाभार्थी हे धान्य काळ्याबाजारात विक्री करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
धुळे शहरासह जिल्ह्यात वेगवेगळ्या दराने धान्याची विक्री होत आहे. ५ ते १० रुपये दराने गहू आणि तांदूळ विकला जात आहे. तसेच काही किरणा दुकानदार तसेच भुसार दुकानदार बेकायदेशीरपणे धान्याची खरेदी करीत आहेत.
शिरपूर आणि साक्री या आदिवासी बहुल भागात धान्याची हेराफेरी करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या असून, ग्रामीण भागातून धान्याची मोठ्या प्रमाणात खरेदी करुन ट्रकांमधून धान्य परराज्यात पाठविले जात असल्याचीही माहितीही मिळाली आहे.
दरम्यान, रेशन दुकानातून मिळालेले धान्य बाजारात विक्री करणाऱ्या लाभार्थींवर आणि खरेदी करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ यांनी दिला आहे. धुळे शहरात आतापर्यंत ७ लाभार्थींवर कारवाई करण्यात आली आहे. ग्रामीण भागातूनही तक्रारी प्राप्त झाल्या असून, लवकरच कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे या काळाबाजाराला आळा बसू शकतो.
आठ रुपये किलो तांदूळ
रेशन कार्डधारक लाभार्थी आपापल्या भागातील किराणा दुकानांवर तसेच धान्य दुकानांवर ५ ते ८ रुपये किलो दराने तांदूळ विकत आहेत.
धुळे तालुका
शहरासह तालुक्यात रेशन दुकानांच्या परिसरात गहू आणि तांदूळ ५ ते १० रुपये किलो दराने विकला जातो. शहरात जास्त भाव मिळत असल्याची चर्चा आहे.
शिरपूर तालुका
शिरपूर तालुका हा आदिवासीबहुल तालुका आहे. शिवाय मध्यप्रदेश सीमा जवळच असल्याने ग्रामीण भागातून काही व्यापारी धान्य खरेदी करून थेट मध्यप्रदेशात रवाना करतात.
साक्री तालुका
साक्री तालुक्यातही जवळपास तीच स्थिती आहे. गुजरात राज्य सीमा जवळ असल्याने लाभार्थींकडून खरेदी केलेले धान्य गुजरातच्या बाजारपेठेत विकले जाते. आळा बसायला हवा.
लाभार्थी स्वत: काळ्याबाजारात धान्य विक्री करीत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. धुळे शहरात आतापर्यंत ७ लाभार्थींवर कारवाई केली आहे. ग्रामीण भागातूनही माहिती प्राप्त झाली असून, लवकरच तेथील लाभार्थींचे रेशन कार्ड रद्द करण्याची कार्यवाही केली जाईल. सुज्ञ नागरिकांनी याबाबत पुरवठा विभागाला माहिती द्यावी. माहिती देणारे व्यक्तींची नावे गुप्त ठेवली जाणार आहेत. - रमेश मिसाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी