धुळे : नवसाच्या कार्यक्रमात जेवणाच्यावेळी थट्टा केली याचा जाब विचारला म्हणून एकास तिघांनी मारहाण केल्याची घटना साक्री तालुक्यातील धाडणे गावात शुक्रवारी सायंकाळी घडली. धाडणे येथील प्रकाश शंकर एंडाईत यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, शुक्रवारी दुपारी गावातील सुनील बोरसे यांच्याकडे असलेल्या कार्यक्रमात जेवणाच्यावेळी आपली थट्टा केली म्हणून मुलगा निखिल याने जाब विचारला. त्यावेळी ललित वसंत बोरसे, निखिल बापू बोरसे, यतीन दत्तात्रय बाेरसे या तिघांनी त्यांच्याशी भांडण केले. हा वाद दुपारी मिटलेला असताना सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास हा वाद पुन्हा झाला. लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. यावेळी बंटी बोरसे, प्रशांत अहिरराव यांनी मध्यस्थी केल्याने आपले प्राण वाचल्याचे प्रकाश एंडाईत यांनी तक्रारीत नमूद केले आहे. पोलिसांनी ललित बोरसे याच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
साक्रीत एकाला तिघांकडून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 22:30 IST