मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर परिसरात पेट्रोल, डिझेल, रासायनिक तसेच शेणखतांच्या किमतीत वाढ झाली आहे. मात्र, त्या तुलनेत शेती पिकांच्या उत्पादनात वाढ न होता घट झाली आहे.
सध्या लाॅकडाऊनच्या नावाखाली शेतकरी नाडला जात असून, आगामी खरीप हंगामातील मशागतीच्या कामांसाठी पैसा हातात नसल्यामुळे व्यापारी मागेल त्या भावात शेती उत्पादन द्यावे लागत आहे. यामुळे पिकांना लागलेला खर्चदेखील निघत नसल्याने बिकट परिस्थिती सध्या मालपूरसह परिसरातील शेतकऱ्यांची झाली आहे.
डिझेलचे दर वाढल्यामुळे शेती मशागतीची कामे करणाऱ्या ट्रॅक्टरधारकांनी दर वाढवले आहेत. मात्र, याचवेळी शेती पिकांचे भाव गडगडल्याने अडचण निर्माण झाली आहे. त्यातच रासायनिक खतांच्या किमतीतही यावर्षी वाढ झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.