शहरातील कोरोनाची परिस्थिती सध्या समाधानकारक आहे. रुग्ण आढळून येण्याचे रोजचे प्रमाण तुलनेने कमी झाले आहे. एप्रिल महिन्यात धुळे जिल्ह्यात रोज सरासरी ४०० कोरोनाचे रुग्ण आढळून येत होते. मात्र मे महिन्यात हेच प्रमाण सरासरी ६० रुग्ण प्रतिदिन असे झालेले आहे. सद्य:स्थितीत अत्यावश्यक सेवांसाठी शिथिलता सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत केली जात आहे. या वेळेत नागरिक आणि दुकानदार, व्यापारी कोरोनाच्या नियमांचे पालन करून तसेच इतर खबरदारीच्या बाबींचा अवलंब करून दैनंदिन व्यवहार करीत आहेत. एप्रिल महिन्यापासून लाॅकडाऊन असल्याने अनेकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. लाॅकडाऊन काळात हातावर पोट असलेले मजूर, गॅरेज मॅकेनिक, तसेच लहानमोठ्या दुकानदारांना बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागले आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन अत्यावश्यक सेवेसह इतर दैनंदिन व्यवहांरासाठी सकाळपासून सायंकाळपर्यंत शिथिलता द्यावी, अशी मागणी आमदार फारूक शाह यांनी पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे.
धुळे शहरात लाॅकडाऊन शिथिल करा : मंत्री आदित्य ठाकरेंना आमदारांचे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:27 IST