धुळे : ग़ स़ बँक गैरव्यवहार प्रकरणी झालेल्या दोन वेगवेगळ्या चौकशीच्या अहवालावरुन सुमारे ४ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे़ याप्रकरणी विभागीय सहनिबंधकांनी बँकेच्या तत्कालिन ३९ संचालकांवर जबाबदारी निश्चित करुन वसुलीची कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती बँक बचाव आंदोलनाचे प्रमुख तथा माजी संचालक राजेंद्र शिंत्रे यांनी दिली़धुळे व नंदुरबार जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी बँक अर्थात ग़ स़ बँकेच्या तत्कालिन संचालकांनी अनावश्यक व अनाठायी खर्च करुन बेकायदेशीर व्यवहार केले़ बँकेत झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी तत्कालिन उपनिबंधक आऱ के़ रत्नाळे आणि सहायक निबंधक एस़ बी़ फुलपगारे यांच्या चौकशी समितीने दोन वेगवेगळ्या चौकशी केल्या आहेत़ यातील फुलपगारे यांच्या चौकशी अहवालात ९ लाख ३१ हजार ५५० रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे नमूद केले आहे़ तसेच रत्नाळे यांच्या चौकशी अहवालात ३ कोटी ७८ लाख २४ हजार ४० रुपयांचा गैरव्यवहार बँकेत झाल्याचे नमूद केले आहे़ या दोन्ही रकमा जबाबदार असलेल्या ३९ तत्कालिन संचालकांकडून वसूल करण्याचे आदेश विभागीय सहनिबंधक ज्योती लाटकर यांनी दिले आहेत़ परंतु मुदतीत संबंधितांकडून गैरव्यवहाराची रक्कम वसुल करण्यात आलेली नाही़येत्या १५ दिवसात गैरव्यवहाराची रक्कम संबंधितांकडून वसुल करण्यात यावी़ अन्यथा आमरण उपोषण करणार असल्याचे राजेंद्र शिंत्रे यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे़
गैरव्यवहार रकमेची वसुली करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 22:41 IST