जळगाव : स्वत:च्या मुलीवर बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी सुनील सीताराम जाधव (मिस्तरी, वय ४५) या पित्याने शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस कोठडीत रविवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.
तांबापुरा भागातील या नराधम पित्याविरुद्ध बलात्कार केल्याप्रकरणी औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात त्याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. औद्योगिक वसाहत पोलिसांनी त्याला शहर पोलीस स्टेशनच्या पुरुष कोठडीत ठेवले होते. आत्महत्येच्या प्रयत्नानंतर उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात तो विक्षिप्तपणे मोठय़ाने ओरडणे, मध्येच जोरात हसणे, आपली कार कोठे आहे? अशी बडबड करीत होता. याप्रकरणी हे.कॉ. अभिमन्यू रतन इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३0९ (आत्महत्येचा प्रयत्न करणे) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक युवराज अहिरे करीत आहेत.
काय केले आरोपीने
२९ रोजी मध्यरात्री गार्डची नजर चुकवित पोलीस कोठडीच्या दरवाजाची कुजलेली पत्र्याची पट्टी तोडली. या पट्टीने पहाटे चार वाजेच्या सुमारास त्याने आपल्या अंगावर, छातीवर, पोटावर आणि मानेवर वार करीत आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथेही त्याने विक्षिप्त वर्तन सुरु केले आहे.