धुळे : येथील मुख्य बाजारपेठेत हाॅकर्सची संख्या मोठी आहे. किरकोळ व्यावसायिक पोटापाण्याचा प्रश्न सोडवित असले तरी त्यांच्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो हे नाकारता येणार नाही. हाॅकर्सला जागा देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असला तरी हा प्रश्न अजूनही प्रलंबितच आहे. शिवाय खाऊगल्लीचे कामदेखील रखडले आहे.धुळे शहरात आग्रारोड, पाचकंदीलसह इतरही प्रमुख रस्त्यांवर फेरीवाले व्यावसायिक दोन्ही बाजूला उभे राहतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. या व्यावसायिकांना स्वतंत्र जागा देण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर व्यावसायिकांची नोंदणी करण्याचे काम करण्यात येत आहे. दुसरीकडे अद्यापही फेरीवाल्यांना स्वतंत्र जागा मिळालेली नाही. त्यामुळे अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित असल्याची स्थिती आहे.शहरात आग्रारोड, पारोळारोडवर तसेच मुख्य चौकात फेरीवाले व्यावसायिक उभे राहतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूला ते उभे राहत असल्याने वाहतुकीची कोंडी होते. काही वेळा रस्त्यावरून पायी चालणेदेखील मुश्किल होते. फेरीवाल्यांना जागा देण्यासाठी महापालिका प्रशासनाने एक समिती नियुक्त केली होती. तसेच व्यावसायिकांसाठी उभे राहण्यासाठी शहरातील काही जागा निश्चित केल्या होत्या. परंतु या जागांना विरोध झाला होता. आता मनपाच्या प्रकल्प विभागाकडून फेरीवाला व्यावसायिकांची नोंदणी करण्यात येत आहे. नोंदणी प्रत्यक्ष जागेवर जाऊन करण्यात येत आहे. परंतु अजूनही जागेचा प्रश्न प्रलंबित आहे. रस्त्यावर फेरीवाल्याची संख्या वाढते आहे. देवपूर दत्तमंदिर चौक परिसरात पूर्वी मोकळया जागेत भाजीबाजार होता. ही जागा खासगी असल्याने बाजार दत्तमंदिर चौकापासून जीटीपी चौकापर्यंतच्या रस्त्यावर भरतो.
हाॅकर्सच्या जागेचा प्रश्न प्रलंबितच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 22:23 IST