शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धुळे जिल्ह्यासह लगतच्या नंदुरबार जिल्हा तसेच मालेगाव तालुका, चाळीसगाव तालुका, अमळनेर तालुका, पारोळा तालुका, मध्य प्रदेशातूनही रुग्ण येतात. जिल्ह्यातून तीन प्रमुख राष्ट्रीय महामार्ग जातात. यामुळे अपघातग्रस्त रुग्ण येथे उपचारासाठी दाखल होतात. मात्र सद्या हिरे वैद्यकीय महाविद्यालयात एकच ऑपरेशन थिएटर सुरू करण्यात आले आहे. वर्षभरापासून कान, नाक, घसा तसेच डोळ्यांच्या शस्त्रक्रिया बंद आहेत. तर एका वाॅर्डात दोन आजारांच्या रुग्णांना ठेवण्यात येत आहे. तर दुसरीकडे तिसऱ्या माळ्यावरील वाॅर्ड मात्र खाली आहे. त्या ठिकाणी कोणतीच सुविधा देण्यात आलेली नाही. तिसऱ्या माळ्यावरील वाॅर्डमध्ये नॉन कोविड रुग्णांना उपचारासाठी दाखल करता येऊ शकणार आहे. महाविद्यालयातील औषधसाठाही संपला आहे. परिणामी गरीब व गरजू रुग्णांना पैसे खर्च करून बाहेरून औषधे विकत घ्यावे लागतात. यामुळे रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत. महाविद्यालयाच्या स्वच्छतेकडेही दुर्लक्ष असून, सर्वत्र अस्वच्छता वाढली आहे. या सर्व समस्यांचा त्वरित निपटारा करण्याबरोबरच महाविद्यालयातील रिक्त असलेल्या वर्ग चारच्या पदांची त्वरित भरती करण्यात यावी, अशी मागणी समाजवादी पार्टीने केली आहे. आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी निदर्शनेही केली. या वेळी अमीन पटेल, आसिफ मन्सुरी, इनाम सिद्दीकी, रफिक शाह, नेहाल अन्सारी, सलीमुद्दीन शेख, सलीम टेलर, अकिल शाह, पप्पू अन्सारी आदी उपस्थित होते.
समाजवादी पार्टीतर्फे हिरे महाविद्यालयात निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:07 IST