धुळे : शेतकरी वाचवा, देश वाचवा, असा नारा देत अखिल भारतीय किसान सभेने शेतकरीविरोधी, जनविरोधी धोरणांच्या निषेधार्थ धुळे येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर नुकतेच धरणे आंदोलन केले. किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. पेट्रोल - डिझेलची दरवाढ त्वरित रद्द करा, औषधी व जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी करा. धुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून कृत्रिम पाऊस पाडण्याचे नियोजन करावे, कोरोना प्रतिबंधक लसी पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्याव्या, सर्वांना मोफत लसीकरण करावे, वन अतिक्रमित प्रमाणपत्रधारक शेतकऱ्यांना पीक कर्ज द्यावे, तसेच गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा लाभ द्यावा, पंतप्रधान सन्मान योजनेचादेखील लाभ द्यावा, प्रलंबित वनदावे त्वरित निकाली काढावेत, शिरपूर तालुक्यात तहसील कार्यालयातील रिक्त पदे त्वरित भरा, या कार्यालयात तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांची बदली करावी, कोरोना काळातील वीजबिल माफ करावे, सन २०२०चे वीजबिल विधेयक रद्द करावे, पपई, फळबागांची नुकसानभरपाई पीक विमा कंपन्यांकडून त्वरित द्यावी आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत.
धरणे आंदोलन करताना किसान सभेचे काॅ. वसंत पाटील, हिरालाल परदेशी, साहेबराव पाटील, ॲड. मदन परदेशी, हिरालाल सापे, गुलाबराव पाटील, पोपटराव चाैधरी, संतोष पाटील, रमेश पारोळेकर, बापू गर्दे, सुधाकर पाटील, अशोक बाविस्कर, शरद पाटील आदी उपस्थित होते.