धुळे : शहरातील मानाचा खुनी गणपतीची पालखीतून पारंपारिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भाविकांची गर्दी झालेली होती. जुना आग्रारोडवरून मूर्ती खरेदी केल्यानंतर फुलांनी सजविलेल्या पालखीत गणपतीची मूर्ती ठेवण्यात आली. पालखीच्या अग्रभागी टाळ-मृदुंगधारी होते. प्रत्येकाने कपाळी बुक्का लावलेला होता. भजन म्हणत ही पालखी मिरवणूक जुन्या आग्रारोडने फुलवाला चौक, गांधी चौक मार्गे जुने धुळे भागात नेण्यात आली. त्याठिकाणी मूर्तीची विधीवत स्थापना करण्यात आली. दरम्यान गणपतीची मिरवणूक येण्यापूर्वी भोईवाडा, जुन्या धुळ्यात प्रत्येक घरासमोर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. महिलांनी गणरायाची आरती केली. या पालखी मिरवणुकीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते.धुळ्यातील मानाच्या गणपती मंदिराला अनेक वर्षांची परंपरा आहे.
मानाच्या गणपतीची पालखीतून मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 12:33 IST