याबाबत धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष शिवानंद बैसाणे यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, गेल्या निवडणुकीत प्राथमिक शिक्षकांना मतदान केंद्राध्यक्ष म्हणून नियुक्ती दिली होती. मतदान केंद्राध्यक्ष हा मतदान केंद्रावरील एक महत्त्वाचा जबाबदार अधिकारी असतो व राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार केंद्राध्यक्ष हे राजपत्रित किंवा वर्ग २ संवंर्गातील अधिकाऱ्यांनाच देण्याचे नमुद केले आहे. तरी प्राथमिक शिक्षकांना मतदान केंद्राध्यक्षांचे काम देवू नये अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच ज्या मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे व त्या मतदार संघांच्या मतदार यादीत ज्या प्राथमिक शिक्षकांची नावे आहेत अशा प्राथमिक शिक्षकांची मतदान कर्मचारी म्हणून नेमणूक करु नये. तसे केल्यास प्राथमिक शिक्षकांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागेल.
वरील प्रमाणे धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने धुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत प्राथमिक शिक्षकांना अडचणी निर्माण होणार आहेत. त्या अडचणी सोडविण्याची मागणीही निवेदनात केली आहे.
निवेदन देताना जिल्हा समन्वयक समितीचे जिल्हाध्यक्ष शिवानंद बैसाणे, सदस्य नविनचंद्र भदाणे, चंद्रकांत सत्तेसा, राजेंद्र भामरे, भूपेश वाघ, योगेश धात्रक, सुरेंद्र पिंपळे आदी उपस्थित हाेते.