धुळे : जळगावकडून धुळ्याच्या दिशेने दुचाकीवरुन येणाऱ्या वृध्द दाम्पत्याला थांबवून दोघांनी पोलीस असल्याची बतावणी केली़ पुढे तपासणी सुरु असल्याचे सांगत विश्वास संपादन केला़ त्यांच्याजवळ असलेले ८५ हजार रुपये किंमतीचे दागिने शिताफिने लांबवल्याची घटना तालुक्यातील कासविहिर शिवारात बुधवारी सकाळी घडली़ दागिने लांबविल्याचे नंतर लक्षात आल्यानंतर धुळे तालुका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला़पारोळा येथील बोरी कॉलनीत राहणारे गुलाब दयाराम पाटील (६५) आणि त्यांची पत्नी हे दोघे दुचाकीने धुळे तालुक्यातील कासविहिर येथे जाण्यासाठी पारोळाकडून धुळ्याकडे येत होते़ कासविहिर गावाच्या शिवाराच्या अलिकडे ते आल्यानंतर २४ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा ते ११ वाजेच्या सुमारास त्यांना दोन अज्ञात इसमांनी थांबविले़ आम्ही क्राईम ब्रँचचे पोलीस आहोत, पुढे तपासणी केली जात आहे़ अंगावर दागिने घालून जावू नका असे सांगत या दोघांनी वृध्द दाम्पत्यांचा विश्वास संपादन केला़ त्यानंतर गुलाब पाटील यांनी आपल्या पत्नीकडे असलेले ४० हजार रुपये किंमतीचा दोन तोळे वजनाचा चपला हार, ४० हजार रुपये किंमतीची दोन तोळे वजनाची मंगलपोत, ५ हजार रुपये किंमतीची ६ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा एकूण ८५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने या अज्ञात व्यक्तींकडे देण्यात आले़ त्यांनी हे दागिने एका पिशवीत ठेवून ते वृध्दाच्या डिक्कीत ठेवल्याचे सांगितले़ वृध्दांची नजर चुकवून त्यांनी तेच दागिने शिताफिने काढून घेतले़ पाटील परिवार पुढे गेल्यानंतर डिक्कीची तपासणी केली असता त्यात दागिने आढळली नाही़ आपली फसगत झाल्याचे लक्षात येताच त्यांनी धुळे तालुका पोलीस ठाणे गाठले आणि फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, बुधवारी दोघांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला़ पोलीस उपनिरीक्षक ए़ बी़ काळे घटनेचा तपास करीत आहेत़
पोलीस असल्याची बतावणी करुन वृध्द दाम्पत्याला दोघांनी लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 13:34 IST