शिंदखेडा : दहा वर्षांपूर्वी झालेल्या जीवघेण्या अपघातातून शारीरिकदृष्टया अपंग झालेल्या शिंदखेडा येथील प्रसाद देसलेने नाशिक विभागात औषध निर्माण अधिकारी या पदासाठी सर्वप्रथम येऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांत आदर्श निर्माण केला केला आहे. विशेष म्हणजे अपंगत्वाचा आधार न घेता खुल्या वर्गातून प्रसादने हे यश मिळविल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. आपल्या शारीरिक अपंगत्वाच्या पार्श्वभूमीवर त्याला शिंदखेडा येथेच ग्रामीण रुग्णालयात फार्मसी अधिकारी या पदावर नुकतीच नियुक्ती मिळाल्याने देसले परिवारात आनंदाचे वातावरण आहे
शिंदखेडा येथील प्रसाद महारू देसले याने फार्मसीमध्ये २०१० मध्ये पदवी घेतली. ऑगस्ट २०१८ मध्ये बडोदा येथे मोठा भाऊ नीलेशकडे जाताना रस्त्यात बसचा मोठा अपघात झाला. त्यामध्ये प्रसादचे मज्जारज्जू दाबले गेले, परिणामी कमरेपासून दोन्ही पाय, हात यांच्यावरील नियंत्रण सुटले. सुमारे दीड वर्षे प्रसादला अंथरुणाला खिळून राहावे लागले. त्यानंतरसुद्धा त्याचे लघवी आणि शौचाचे नियंत्रण पाच वर्षांपर्यंत बंद झाले. या परिस्थितीत त्याची भाऊ योगेश, वहिनी सौ. रूपाली, आई अरुणाबाई यांनी लहान मुलासारखी देखभाल केली
प्रसादचा मित्र हुसेन शेख याने दिवस-रात्र व्यायाम देऊन त्याला उभारी दिली. यादरम्यान एप्रिल २०१४ मध्ये खुर्चीवर बसूनच चॅलेंजर क्लासेस सुरू केले. अनेक गरीब मुला-मुलींना स्पर्धा परीक्षेसाठी माफक फीमध्ये तयार केले. त्यापैकी अनेकांना प्रशासन अधिकारी, वनरक्षक, पोलीस, सैनिक पदावर नोकरी मिळाली. प्रसादलाही कोकण विभागात कृषी सहायक या पदावर डिसेंबर २०१८ मध्ये नियुक्ती मिळाली होती; परंतु शारीरिकदृष्टीने एवढ्या लांब पाठविण्यास त्याचे कुटुंब तयार झाले नाही.
२८ फेब्रुवारी रोजी नाशिक विभागातून सुमारे तीन हजार उमेदवारांमधून अव्वल येत प्रसादने फार्मसी अधिकारी हे पद मिळवले आहे. कागदपत्र तपासणीदरम्यान आरोग्य उपसंचालक आणि स्टाफ़ने प्रसादचे अपंग असूनही खुल्या वर्गातून विभागात प्रथम आल्याबद्दल कौतुक केल. धडधाकड असूनही काहीतरी निमित्त दाखवून अपयश पाडणाऱ्यांसमोर मनाने सक्षम असणाऱ्या प्रसादने आदर्श निर्माण केला आहे.