कापडणे : चीनसह अन्य देशात कोरोना व्हायरसचा फैलाव झाल्यानंतर सोशल मिडियावर शास्त्रीय आधार नसलेल्या पोस्ट फिरत आहेत. यामुळे मांसाहारी नागरिकांनी ‘कोरोना व्हायरस’चा धसका घेत कोंबडी व अंड्यांपासून दूर राहणे पसंत केले आहे. यामुळे कुक्कुट पालन व अंडी उत्पादन व्यवसाय धोक्यात आला आहे.गेल्या काही दिवसांपूर्वी चीनसह अन्य देशातील लोकांमध्ये कोरोना विषाणूची लागण झाल्याने मोठी खळबळ उडाली. त्यात कोरोना व्हायरस हे कच्चे मांसापासून प्रसारित होत असल्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. त्यात भारतासह महाराष्ट्रातही बॉयलर कोंबड्या व अंड्यामुळे कोरोना व्हायरस प्रसारित होत असल्याची चुकीची माहिती सोशल मीडियाद्वारे व्हायरल होत असल्याने कोंबडी व अंड्यांच्या मागणीत मोठी घट आली आहे.यामुळे कापडणे गावातील कुक्कुट पालन व बॉयलर अंडी उत्पादन व्यवसाय धोक्यात आलेला आहे. पोल्ट्री फार्मवर दररोज अंडी पडून राहत असल्याने खराब होत आहे. यामुळे व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.कापडणे गावात नानाभाऊ देवराम माळी, योगेश नानाभाऊ माळी यांचा अंडी उत्पादनाचा पोल्ट्रीफार्म असून सुरेश दयाराम बोरसे, शुभम सुरेश बोरसे, मनोहर भास्कर पाटील, गेंदीलाल पाटील, दिलीप पाटील, नरेंद्र रमेश पाटील, प्रफुल्ल रंगराव पाटील, नितीन पाटील, विजय धनगर पाटील आदी १५ ते २० शेतकऱ्यांचे बॉयलर कोंबड्यांचे उत्पादन घेणारे पोल्ट्री फार्म आहेत.मात्र, सोशल मिडियावर कोरोना व्हायरसबाबतच्या खोडसाळ पोस्ट प्रसिद्ध होत असल्याने पोल्ट्री व्यवसायाला कमालीची मंदी येऊन व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आलेले आहेत.बॉयलर कोंबड्या व अंड्यांना होलसेल व्यापारी खरेदी करायला तयार नाहीत. मालाला मागणी नसल्याने पोल्ट्री व्यवसाय बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.यासाठी शासनाने ताबडतोब दखल घेऊन जनजागृती करून पोल्ट्री व्यवसायाला प्रोत्साहन द्यायला हवे, अशी मागणी येथील शेतीपूरक व्यवसाय करणाºया शेतकऱ्यांनी केली आहे.सध्या कोंबडीच्या एक अंड्याचे उत्पादन घेण्यासाठी ३ रुपये ९० पैसे खर्च येत आहे. मात्र, अंड्याची विक्री केवळ ३ रुपयापर्यंत होत आहे. दररोज प्रत्येक अंडा उत्पादनामागे ९० पैसे नुकसान सोसावे लागत आहे. यामुळे दररोज हजारो रुपयांचा तोटा होत आहे. कोरोना व्हायरसबाबत सोशल मिडियावर चुकीच्या पोस्ट फिरत असल्याने मोठे नुकसान होत आहे. थोड्याच दिवसात कोंबडी, अंडी उत्पादन व्यवसाय बंद करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. शेती बँकेला तारण देऊन लाखो रुपयांचे कर्ज पोल्ट्री व्यवसायासाठी काढलेले आहे तेसुद्धा फेडले जाणार नाही. पोल्ट्री व्यवसाय बंद झाल्यामुळे बेरोजगारीत वाढ होणार आहे व शेतीपूरक व्यवसाय अडचणीत येऊन सर्वत्र शेतकरी कर्जबाजारी होण्याची चिन्हे दिसत आहेत. यासाठी शासनाने जनजागृती करून कोंबडी व अंडी उत्पादन व्यवसायाला चालना देण्याची गरज आहे.-योगेश नानाभाऊ माळी, अंडी उत्पादक सुशिक्षित बेरोजगार शेतकरी, कापडणेकोरोना व्हायरस हा वेगळा विषय आहे आणि अंडी व मांस हा एक वेगळा विषय आहे. दोघांचा एकमेकांशी काहीएक संबंध नाही. यासंदर्भात भारत व महाराष्ट्रातील पशुवैद्यकीय कुक्कुटपालन खात्यामार्फत जनजागृती करणे गरजेचे आहे. चुकीच्या अफवेमुळे कुक्कुट पालन व्यवसाय ब्रॉयलर व अंडी उत्पादनाचा व्यवसाय अडचणीत येऊन बंद पडत आहेत. कालांतराने व्यवसायिक कर्जबाजारी होतील व सुशिक्षित बेरोजगार अधिक निर्माण होतील. यासाठी प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यायला हवी.-विशाल भिमसिंग ठाकूर, अध्यक्ष, उत्तर महाराष्ट्र अंडी उत्पादक संघटना
पोल्ट्री फार्म व्यवसाय धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 13:38 IST