नेर धुळे तालुक्यातील मोठे गाव आहे. येथील जिल्हा परिषद शाळेची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे मूलभूत सुविधा नसल्याकारणाने पालकांचेही दुर्लक्ष होत आहे.
नेरची जिल्हा परिषद शाळा क्रमांक १च्या इमारतीचे ब्रिटिशकालीन बांधकाम असून, ती पूर्णपणे जीर्ण झाली आहे. तिची काही कामे केली आहेत, पण ती खूपच निकृष्ट दर्जाची आहेत. त्यामुळे पावसाळ्यात या शाळेला गळती लागून पाणी साचत आहे. विशेष म्हणजे, शाळा क्रमांक २, ३, ४च्या कोणत्याही वर्गखोलीत मुलांना बसण्यास योग्य राहत नाही. पिण्याच्या पाण्याची दुरवस्थाच आहे. सुलभ शौचालय पडक्या व घाणीचे साम्राज्य आहे. संरक्षण भिंत पडक्या अवस्थेत आहे. आता तर शासनाने ऑनलाइन शिक्षण द्यावे, असे आदेश दिले आहेत. मात्र, वीजबिले भरले नसल्या कारणांमुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे मुलांना ऑनलाइन कसे शिक्षण देणार, असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. तरी शिक्षणाची ही दुरवस्था बघून गावातील सूज्ञ नागरिकांना खूपच वाईट वाटत आहे. त्यामुळे लवकरात लवकर यावर शिक्षण समितीने निर्णय घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
शाळेची दशा बघून वाटते खंत
नेर गावातील शिक्षण व्यवस्थेची ही दशा बघून अत्यंत वाईट वाटते. ज्या गावातून राहुरी विद्यापीठाला कुलगुरू दिले. अनेक डॉक्टर, इंजिनीअर, शिक्षक, विविध विभागांतील अधिकारी दिलेल्या शाळेची अवस्था पाहून खंत वाटते. यासाठी गावाने माझ्याबरोबर पुढाकार घेऊन सुधारणेसाठी आग्रही राहावे.
-डॉ.सतीश बोढरे, सामाजिक कार्यकर्ता, नेर