धुळे : धुळे तालुक्यातील अंचाळे येथे ग्रामपंचायत निवडणुकीनंतर मनाई असतानाही वाजविला जाणारा डीजे बंद करण्यासाठी गेलेल्या पोलीस उपनिरीक्षकाची कॉलर पकडून धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात सोमवारी सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल झाला.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी संजय यादव यांनी जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन होणार नाही, याची खबरदारी घेण्यासाठी धुळे तालुका पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सागर काळे हेे धुळे तालुक्यातील अंचाळे गावात गेले होते. सोमवारी दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास ग्रामपंचायतीत विजयी झालेल्या उमेदवारांच्या समर्थकांनी डीजे हे वाद्यवृंद लावल्याचे लक्षात आले. परिणामी, डीजे बंद करण्यासाठी, तसेच गावात झालेली गर्दी पांगविण्यासाठी काळे हे गेले असता, गावातील संजय भास्कर पाटील याने त्यांना अडविले, शिवाय त्यांची कॉलर पकडून हुज्जतही घातली.
या प्रकरणी उपनिरीक्षक सागर काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संजय पाटील याच्या विरोधात भादंवि कलम ३५३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.