धुळे : रात्रीची वेळ झाली असल्याने आपआपल्या घरी जा असे सांगितल्याचा राग आल्याने देवपुरातील अंदरवाली मशिदजवळ एका जमावाने पोलिसांना धक्काबुक्क केली तसेच मारहाण करीत पोलिसांवर दगडफेक केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते़ ही घटना शनिवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास घडली़ रविवारी पहाटे ११ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला़देवपुर भागात शनिवारी मध्यरात्री देवपूर पोलिसांची रात्रीची गस्त सुरु होती़ त्याचवेळेस देवपुरातील अंदरवाली मशीदजवळ एक जमाव जमला होता़ त्यांना पोलिसांनी हटकले आणि रात्र बरीच झाली असल्याने आपआपल्या घरी जा असे सांगितले़ याचा राग आल्याने जमावातील एकाने पोलिसांजवळ येऊन कॉलर पकडली आणि धक्काबुक्की केली़ एवढ्यावरच न थांबता हाताने मारहाण केली़ शासकीय काम करु नये आणि पोलिसांवर दहशत बसावी या एकमेव उद्देशाने गर्दी जमा करण्यात आली़ दगडफेक करण्यात आली़याप्रकरणी पोलीस कर्मचारी प्रकाश शंकर थोरात यांनी रविवारी पहाटे सव्वा पाच वाजेच्या सुमारास देवपूर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली़ त्यानुसार, हबीब उर्फ बर्नर अयूब खान (रा़ मरिमाता मंदिराजवळ, देवपूर), रिजवान खान अफजलखान पठाण (रा़ विटाभट्टी, देवपूर), आवेश आरिफ पठाण, आसीफ इकबाल अन्सारी, भुऱ्या इकबाल अन्सारी, शेख नदीम शेख युसूफ, आबीद अली साबीर अली, शेख मोमीन शेख युसुफ, मोहम्मद जुनेद मोहम्मद जाकीर, अरबाज युनुस शेख, हमीद उर्फ लल्लू बॉस (सर्व रा़ अंदरवाली मशीदजवळ, देवपूर) यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला़ सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले़
धुळ्यातील देवपुरात पोलिसालाच धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 11:55 IST