धुळे -महापलिकेतील सर्व नगरसेवकांना आपापल्या प्रभागाच्या विकासासाठी २० लाखांच्या निधी अशी एकूण १६ कोटींची तरतूद करण्यासाठी नियोजन केले जात असल्याचे अधिकृत सुत्रांनी सांगितले. यामुळे विविध प्रभागामधील नागरी समस्या सोडविण्याच्या कामांना वेग येणार आहे.
कोरोनाच्या संसर्गामुळे मागील वर्षापासून शहरातील अनेक भाग नागरी सेवा सुविधांपासून वंचित राहिले. वर्ष उलटल्यानंतरही कोरोनाची परिस्थिती आहे तशीच असून तेव्हापेक्षा आता कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. शहरातील विविध भागातून १३६ कोटींची पाणी पुरवठा योजना, भुमिगत गटार योजना, भुमिगत ड्रेनेज लाईन यामुळे रस्त्यांचे बारा वाजले आहेत. पथदिवे काही ठिकाणी अद्यापही बंद आहेत. हद्दवाढीनंतर शहराला दहा गावे जोडली गेली. या गावांचा शहरात समावेश झाला असला तरी शहरी मुलभूत सुविधा अद्यापहीपूर्णपणे मिळालेल्या नाहीत. हद्दवाढीतील गावांसह शहरातील रस्ते, शौचालय, पथदिवे, पाणी पुरवठा, उद्यानांची दुरूस्ती यांसारख्या अनेक विकास कामांबाबत प्रस्ताव पाठविण्याबाबत नगरसेवकांना आवाहन करण्यात येईल. त्या अनुषंगाने नगरसेवकांनी प्रस्ताव सादर केल्यास आपापल्या प्रभागातील विकास कामे करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. नवीन अर्थसंकल्पाम मनपातील विविध विभागांमधील कामे पूर्ण करण्यासाठी तरतूद करण्यासाठी प्रशासकीय विभागातील अधिकाऱ्यांच्या बैठकांना गती आली आहे.