धुळे : कोरोनाच्या काळ अतिशय कठीण असून, या काळात जेष्ठ नागरिकांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य जपणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे व्यवस्थापन सदस्य दिलीप पाटील यांनी केले. ते श्री. देवपूर विधायक समिती, धुळे व आजीवन अध्ययन व विस्तार विभाग कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाईन कार्यशाळेत बोलत होते.
‘कोरोनाला थांबवू या : ज्येष्ठ नागरिकांचे शारीरिक-मानसिक स्वास्थ्य जपुया’ या विषयावर एक दिवसीय ऑनलाइन कार्यशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक प्रा. डॉ. मनीष जोशी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी दिलीप पाटील यांनी कार्यशाळेचे उद्घाटन केले. कार्यशाळेत सहभागी तज्ज्ञ मार्गदर्शक योगगुरू डॉ. बारचे गंगाधर यांनी योग आणि करोना या विषयावर मार्गदर्शन केले. सूप्रसिद्ध चिकित्सक डॉ. दिलीप पाटील यांनी वैद्यकीय शास्त्र आणि कोरोना शारीरिक-मानसिक स्वास्थ्य या विषयावर मार्गदर्शन करत श्रोत्यांचे गैरसमज दूर करत करोनापासून संरक्षणाचे अनेक उपाय सांगितले. योग शिक्षक जितेंद्र भामरे यांनी प्रात्यक्षिक योगाभ्यास आणि करोनावर मात कशी केली जाईल या विषयावर प्रबोधन केले. कार्यशाळेच्या समन्वयक डॉ. अनिता पाटील यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले. सुषमा सबनीस, अनिल पाटील, प्रतीक्षा पाटील यांनी प्रमुख अतिथींचा परिचय केला. धुळे, नंदुरबार व जळगाव आदी जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक कार्यशाळेत सहभागी झाले होते.