लोकमत न्यूज नेटवर्ककुसुंबा : शिंदखेडा तालुक्यातील बेटावद गावा पासून १० कि.मी.वर जागृत देवस्थान मुडावदचे कपिलेश्वर मंदिरात जाण्यासाठी बनविण्यात आलेल्या पूलाला समांतर रस्ता खासगी शेतातून गेल्याने तो रस्ता बंद केला आहे. त्यामुळे पूलासाठी केलेले १२ कोटी रुपये खर्च पाण्यात गेल्याचे परिसरातून बोलले जात आहे.महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश आदी ठिकाणी ओळख असलेले मुडावद गावी तापी नदी व पांझरा या नद्यांच्या पवित्र संगमावर कपिलेश्वर महादेवाचे भव्य मंदिर असून या ठिकाणी दरवर्षी पांझरा पात्रात महाशिवरात्रीला १५ दिवस यात्रा भरत होती.परंतू सुलवाडे बॅरेज झाल्याने त्याचा बॅकवॉटर पांझरा नदीत आल्याने ही यात्रा वर टेकड्यावर सपाट जागी भरत आहे. परंतू भाविकांच्या दृष्टिने पांझरा नदीत पाण्याचा विसर्ग असल्याने भाविकांना नावेचा आसरा घेऊन मंदिरापर्यंत जावे लागते. त्यामुळे मुडावद ते कपिलेश्वर मंदिर असा पुल व्हावा म्हणून मुडावद येथील नागरीकांसह मागणी केली गेली व त्या मागणीला यश येऊन २ वर्षा पूर्वी खासदार निधीतून त्या पुलासाठी १२ कोटीचा निधीही मंजूर झाला. पुलाचा सर्वे झाला तो मनमानीपणाने केला गेल्याचे मुडावद येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. कारण मुडावद ते कपिलेश्वर पुलाचा समांतर रस्ता हा एका खासगी शेतातून काढला गेला. त्या मुळे शेतमालकाने तो रस्ता बंद केल्याने भाविकांसाठी ती डोकेदुखी झालेली आहे. ज्या वेळी या पुलाचा सर्वे केला गेला त्या वेळी मुडावद येथील ग्रामस्थांनी त्या ठिकाणच्या पुलाला विरोध केला होता. परंतू त्यावेळचे संबंधित अधिकाऱ्यांनी या विरोधाला न जुमानता पुल त्या ठिकाणी केला गेला व त्या पुलाचा कपिलेश्वर कडील समांतर जोड रस्ता खासगी शेतातून निघाल्याने तो शेत मालकाने बंद केला.त्यामुळे पुलाचे ९ कोटी व दोन्ही साईडचे समांतर जोड रस्त्याचे ३ कोटी असे १२ कोटीरुपये पाण्यात गेल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे.कपिलेश्वर मंदिर परिसरात हा जोड रस्ता येतो त्या मुळे कार्यकारी अभियंता सार्व बांधकाम विभाग धुळे यांनी या बाबत चौकशी करुन दोन्ही साईडचे समांतर रस्ते विनाविलंब करण्यास ठेकेदारास भाग पाडावे अन्यथा याबाबत केंद्रीय स्तरावर पाठपुरावा करुन न्याय मागणार असल्याचे मुडावद येथील मंगेश सोनवणे, जगन तामखाने, राजु पाटील यांच्यासह परिसरातील ग्रामस्थांनी सांगितले.
शेतातून जाणारा समांतर रस्ता केला बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 14:09 IST