धुळे : जिल्ह्यात कोरोनाच्या गंभीर रुग्णांची संख्या वाढत असल्याने ऑक्सिजन, रेमडेसिविर आणि लस हे उपचारासाठी आवश्यक असलेले तीनही घटक वेटिंगवर आहेत. रुग्णांना आणि रुग्णांच्या नातेवाईकांची त्यासाठी सरकारी तसेच खासगी रुग्णालयांमध्ये देखील धावपळ होताना दिसत आहे.
रुग्णालयांना मागणीप्रमाणे ऑक्सिजनचा पुरवठा असला तरी ऑक्सिजन बेडची आणि व्हेंटिलेटरची संख्या कमी असल्याने अनेक रुग्ण वेटिंगवर आहेत. हिरे रुग्णालयात ३५६ रुग्ण दाखल आहेत. त्यात ३१० जण ऑक्सिजनवर आहेत तर व्हेंटिलेटरसाठी वेटिंग आहे.
रेमडेसिविर इंजेक्शन केवळ गंभीर रुग्णांसाठी असताना खासगी रुग्णालयांमध्ये डाॅक्टरांकडून सर्वांनाच इंजेक्शनबद्दल आग्रह केला जात असल्याने तुटवडा भासत आहे. त्यामुळे इंजेक्शनची मागणी हजारात असताना केवळ शेकडोमध्ये इंजेक्शन मिळत आहेत. हिरे रुग्णालयाला दिवसाला १०० इंजेक्शन लागतात. परंतु त्यांना गुरुवारी ४० आणि शुक्रवारी १०२ इंजेक्शन मिळाले.
कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा भासत असल्याने जिल्ह्यात लसीकरणाचा वेग मंदावला आहे. आणखी लसींची प्रतीक्षा आहे.
ऑक्सिजन : पुरवठा पुरेसा, पण बेडची संख्या मात्र कमी
धुळे जिल्ह्यातील सरकारी तसेच खासगी रुग्णालयांमध्ये मागणीप्रमाणे ऑक्सिजनचा पुरवठा होत असला तरी बेडची संख्या मात्र कमी आहे. गंभीर रुग्णांवर उपचार करणाऱ्या हिरे वैद्यकीय महाविद्यालयात १३ टन ऑक्सिजनची मागणी असून तितका पुरवठा होत आहे. टँक खाली झाल्यावर पुन्हा ऑक्सिजन भरला जातो. दरम्यान, हिरे रुग्णालयाला २० टन क्षमतेचा आणखी एक ऑक्सिजन टँक मिळणार आहे.
रेमडेसिविर : मागणी हजारो इंजेक्शनची, मिळतात शेकडोत
धुळे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवेंदिवस वाढत आहे. सध्या ३ हजार ६८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी १९६५ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. रुग्णांची संख्या पाहता रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी हजारोंमध्ये आहे. परंतु केवळ शेकडोतच उपलब्ध होत आहेत. गुरुवारी धुळे जिल्ह्याला ६०४ इंजेक्शन मिळाले तर शुक्रवारी केवळ २६८ इंजेक्शन मिळाले. त्यांचे वाटप विविध रुग्णालयांना केले आहे.
लसीकरण : साठा नसल्याने केवळ ७५ केंद्रांवर लसीकरण
धुळे जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लस टप्प्याटप्प्याने उपलब्ध होत आहेत. गेल्या आठवड्यात २१ हजार ५०० डोस आले होते. सध्या १२ ते १३ हजार लस शिल्लक आहेत. त्यातून ७५ केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. शहरासह जिल्ह्यातील काही लसीकरण केंद्र लसींच्या तुटवड्यामुळे बंद आहेत. कोरोना लसींचा आणखी साठा उपलब्ध झाल्यावर लसीकरण केंद्रांची संख्या वाढणार आहे. १ लाख ३५ हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे.
सरकारी तसेच खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही यासाठी प्रशासन विशेष लक्ष देत आहे. लसीकरणाला वेग यावा यासाठी आणखी लसींची मागणी नोंदवली आहे. सर्वाधिक समस्या रेेमडेसिविर इंजेक्शनची आहे. गरज नसताना रुग्णांकडून या इंजेक्शनची मोठ्या प्रमाणात मागणी केली जात आहे. त्यामुळे गंभीर रुग्णांना वेळेवर इंजेक्शन उपलब्ध होत नाही. त्यासाठी आवश्यक असेल तरच इंजेक्शन द्यावे अशा सूचना रुग्णालयांना दिल्या आहेत. इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी स्वतंत्र पथक तयार केले आहे. कुठे काळाबाजार होत असेल तर नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रार करावी. जास्तीत जास्त इंजेक्शनची मागणी नोंदवली आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे.
- संजय यादव, जिल्हाधिकारी