धुळे महापालिकेच्या अडीच वर्षाच्या महापौर पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर नवीन महापौर कोण होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. सोमवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत असल्याने भाजपाकडून नगरसेवक प्रदिप कर्पे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे. महापालिकेत भाजपाचे बहुमत असल्याने कर्पे यांची निवड निश्चित आहे. दरम्यान शेवटच्या दिवशी कॉंग्रेस, शिवसेना, एमआयएमसह एक अपक्ष एकूण पाच उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे निवड बिनविरोध होणार नाही, हे सुद्धा स्पष्ट आहे.
महापौर पदाच्या निवडणूकीसाठी काही दिवसापासून मनपाचे राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. महापौर पदासाठी नगरसेविका प्रतिभा चौधरी, देवेंद्र सोनार, संजय पाटील, प्रदिप कर्पे तसेच वालीबेन मंडोरे इच्छुक होते. शनिवारी पक्ष निरीक्षकाकडून चार जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत असल्याने भाजपाकडून प्रदिप कर्पे याचा एकमेव अर्ज दाखल झाला. नगरसेवक कर्पे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करतांना मावळते महापौर चंद्रकांत सोनार,नगरसेविका वैशाली वराडे, गजेंद्र अंपळकर, किरण कुलेवार, राकेश कुलेवार, प्रशांत बागुल, अशोक गवळी, सनी चौधरी उपस्थितीत होते. यावेळी कर्पे यांचा उमेदवारी अर्ज नगरसचिव मनोज वाघ यांच्याकडे दाखल केला. एका अर्जावर सूचक म्हणून माजी महापौर सोनार तर अनुमोदक म्हणुन योगिता बागुल तर दुसऱ्या अर्जावर सुचक म्हणून वैशाली वराडे तर अनुमोदक किरण कुलेवार होत्या.
कॉंग्रेस, शिवसेना आणि एमआयएमचेही अर्ज
सोमवारी दुपारी २ वाजेपर्यत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत असल्याने मुदतीअखेर कॉंग्रेसकडून मदिना समशेर पिंजारी, शिवसेनातर्फे ज्योत्स्ना पाटील तर एमआयएमच्या सईदा इकबा अन्सारी यांचा आणि अपक्ष म्हणून नगरसेवक मोमीन आसिफ इस्माईल यांनी अर्ज दाखल केला. एमआयएमचा अर्ज दाखल करतांना आमदार डॉ.फारूख शाह देखील उपस्थित होते.