शहरात एकूण २० ठिकाणी लसीकरण केंद्र आहेत. त्यात मनपाचे ११ तर ९ खासगी रुग्णालयांत कोरोनाची लस दिली जात आहे. मात्र, पुरेशा डोसअभावी लसीकरणात वारंवार व्यत्यय येत आहे. शनिवार व रविवारी मनपाच्या केवळ एका केंद्रावर लसीकरण सुरू होते. सोमवारी मात्र डोस संपल्याने सर्व केंद्रे बंद होती.
एकीकडे आवाहन, दुसरीकडे टंचाई -
जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट अतिशय तीव्र झाली आहे. त्यामुळे लसीकरण करून घेण्याचे आवाहन प्रशासन वारंवार करत आहे. मात्र, दुसरीकडे पुरेशे डोस उपलब्ध नसल्याने लसीकरण मोहिमेत वारंवार खोडा निर्माण होतो आहे. आता ५ हजार डोस मिळाले आहेत. मात्र ते केवळ तीन दिवस पुरतील. त्यानंतर वेळेवर डोस उपलब्ध न झाल्यास लसीकरण मोहिमेत पुन्हा व्यत्यय येईल. १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वाना लस घेता येणार आहे. मात्र पुरेसे डोस प्राप्त होणार नसतील तर लसीकरण कसे होईल असा प्रश्न निर्माण होतो आहे. लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आहे. ४५ व ६० वर्षांवरील नागरिकांची लसीकरण केंद्रांवर गर्दी झालेली असते. मात्र, मोजके डोस मिळत असल्याने अनेक नागरिकांना लस न घेताच परत जावे लागत आहे.
प्रतिक्रिया -
डोस संपल्याने मनपाच्या केंद्रांवर सोमवारी लसीकरण बंद होते. आता मात्र कोविशिल्डचे ५ हजार डोस मिळाले आहेत. मनपाच्या सर्व ११ केंद्रांवर लसीकरण सुरू राहील. १ मे पासून १८ वर्षांवरील लसीकरण सुरू होणार आहे. त्यासाठी उद्यापासून नोंदणी करणे आवश्यक आहे.
डॉ. पल्लवी रवंदळे, लसीकरण प्रमुख मनपा