धुळे : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर एस.टी. महामंडळाची बससेवा सुरू झालेली आहे; मात्र उत्पन्न मिळविण्यासाठी महामंडळानेही लांब पल्ल्याच्या बसफेऱ्यांना प्राधान्य दिलेले आहे. ग्रामीण भागातील बसच्या फेऱ्या कमी आहेत. त्यातल्या त्यात मुक्कामी बसेसची संख्या तर प्रचंड कमी आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे.
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून बससेवेचे वेळापत्रकच कोलमडलेले आहे. ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी बसेसच्या आता ग्रामीण भागातील फेऱ्याही मर्यादीतच झालेल्या आहेत.
धुळे जिल्ह्यात पाच आगार असून, या सर्व आगारांच्या बसेस कोरोनापूर्वी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जास्त होत्या; मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर ग्रामीण भागात मुक्कामी बसेसची संख्या रोडावली आहे.
नियोजन करणे सुरू
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर बससेवा पूर्ववत सुरू झालेली आहे. कोरोनापूर्वी शाळा-महाविद्यालयाच्या उद्देशानेच ग्रामीण भागातील मुक्कामी बससेवा सुरू होती. आता ज्या-ज्या मार्गावरील विद्यार्थ्यांना पासेस उपलब्ध होत आहेत, त्या मार्गावर ग्रामीण भागात मुक्कामी बससेवा सुरू करण्यात येत आहे. येत्या सोमवारपासून अजून ग्रामीण भागातील फेऱ्या सुरू करण्याचा प्रयत्न आहे; मात्र बस सुरू करीत असताना डिझेलचा खर्च निघणे महत्त्वाचे आहे. प्रवाशांचा प्रतिसाद व मागणीनुसार बससेवा सुरू केली जाईल.
स्वाती पाटील, आगार प्रमुख धुळे.
आमचे गाव दुर्गम भागात आहे. या गावातील प्रवाशांना एस.टी.शिवाय प्रवासाचे साधन नाही. गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोलचे दर वाढल्याने, दुचाकी वापरणे परवडत नाही; मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून आमच्या गावात मुक्कामी बस येतच नाही. आम्हाला खासगी वाहनांनेच प्रवास करावा लागत आहे. एस.टी. ही ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असल्याने, ग्रामीण भागात बससेवा सुरू झाली पाहिजे. यासंदर्भात विचारणा केली असता, बससेवा सुरू केली जाईल, असे सांगण्यात येते; मात्र बसेस सुरू केल्या जात नाहीत.
- रमेश पावरा.
प्रवासी
मे महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाटही ओसरलेली आहे. त्यानंतर शहरी भागासाठी एस.टी.ची सेवा जोरात सुरू आहे; मात्र उत्पन्नाचे कारण दाखवत ग्रामीण भागासाठी बससेवा सुरू करण्यास टाळाटाळ केली जात आहे. ग्रामीण भागातील अनेक प्रवासी हे केवळ एस.टी.च्या सेवेवरच अवलंबून आहेत. बससेवा सुरू नसल्याने, त्यांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. ज्या मार्गावर जास्त प्रवासी आहेत, त्या ग्रामीण मार्गावरील फेऱ्या तत्काळ सुरू करण्याची आवश्यकता आहे.
- दिनेश पाटील,
प्रवासी.