जिल्ह्यातील रेल्वेस्थानकावर तिकीट चेकरकडून प्लॅटफाॅर्म तिकिटे तपासली जात नसल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे प्रवासी न घाबरता विनाप्लॅटफाॅर्म तिकीट रेल्वेस्थानकावर वावरताना दिसतात. पार्किंगच्या बाबतीतही तशीच परिस्थिती आहे. धुळे स्थानकाचा अपवाद वगळता इतर रेल्वेस्थानकावर पार्किंगला फारसा प्रतिसाद मिळत नाही. या प्रश्नांकडे रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
प्लॅटफाॅर्म तिकिटातून कमाई मिळेना
रेल्वेस्थानकावर प्रवाशांना तसेच सोबत आलेल्या नातेवाइकांना प्लॅटफाॅर्म तिकीट काढणे नियमाने बंधनकारक आहे. मोठ्या शहरांमध्ये असलेल्या जंक्शन स्टेशनवर या नियमाची कठोर अंमलबजावणी होते. परंतु, छोट्या रेल्वे स्टेशनवर त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होताना दिसत नाही. धुळे जिल्ह्यात धुळे, नरडाणा, शिंदखेडा आणि दोंडाईचा येथे रेल्वेस्थानके आहेत. परंतु येथे येणारे प्रवासी आणि सोडण्यासाठी आलेले नातेवाईक एखादा अपवाद वगळला तर प्लॅटफाॅर्म तिकीट काढत नाहीत. त्यामुळे धुळे जिल्ह्यात प्लॅटफाॅर्म तिकिटाच्या माध्यमातून मिळणारी कमाई शून्य आहे असेच म्हणावे लागेल. रेल्वे प्रशासनाने त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
जिल्ह्यातील रेल्वेस्थानकांवर प्लॅटफाॅर्म तिकिटचा दर १० रुपये आहे. कोरोनाकाळात या तिकिटाचा दर ५० रुपयांवर गेला होता; परंतु आता पुन्हा १० रुपये दर आहेत. परंतु प्रवासी प्लॅटफाॅर्म तिकीट काढत नाहीत.
पार्किंगचा ठेका कुणी घेतच नाही
धुळे जिल्ह्यात दोंडाईचा, शिंदखेडा आणि नरडाणा रेल्वेस्थानकावर पार्किंगचा ठेका देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने निविदा काढली होती. दोंडाईचा येथे ठेकादेखील दिला होता; परंतु पार्किंगला प्रतिसाद मिळाला नाही. काही खासगी व्यक्तींकडून त्यांच्या ताब्यातील जागांवर पार्किंगचा व्यवसाय केला जात असल्याची चर्चा आहे.
धुळ्यात पार्किंगला प्रतिसाद
धुळे रेल्वेस्थानकावर पार्किंगला प्रतिसाद मिळताे. सर्वाधिक कमाई विद्यार्थ्यांच्या सायकल पार्किंगच्या माध्यमातून होत असते. दुचाकी आणि चारचाकी वाहनांची कमाई कमी आहे. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून धुळे-चाळीसगाव रेल्वेच्या फेऱ्या बंद असल्याने तेव्हापासून पार्किंगदेखील बंद आहे. प्रवासी नसल्याने ठेकेदाराचे नुकसान झाले.
रेल्वेस्थानकावर कुणालाही प्लॅटफाॅर्म तिकीट काढावे लागते हेच माहीत नाही. अनेक वेळा सुरत ते नरडाणा प्रवास करतो; पण हे तिकीट काढण्याची आवश्यकता भासली नाही. कुणीही विचारत नाही किंवा तपासणी होत नाही.
- प्रवासी
रेल्वे प्रवाशांना रेल्वेस्थानकावर तसेच प्रवासादरम्यान सुविधा पुरविल्या जातात. त्यामुळे प्रवाशांनी प्लॅटफाॅर्म तिकीट काढले पाहिजे. याच पैशांतून स्थानकावर सुविधांचा विकास केला जातो.
- प्रवासी