राज्यपाल हे संविधानिक पद असून त्यांची प्रतिष्ठा राखणे व मानसन्मान करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. परंतु राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून संविधानिक पदाची जबाबदारी न सांभाळता राजकीय पक्षाचे काम करीत आहेत. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत राज्यातील शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांना भेट नाकारण्यात आली. कंगना रनौतला भेटणाऱ्या राज्यपालांना वेळ आहे. परंतु शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. ही बाबत खेदजनक असल्याने गुरुवारी राष्ट्रवादीकडून राज्यपाल कोश्यारी यांना कमलाबाई कन्याशाळा परिसरात काळे झेंडे दाखविण्यात आले.
यावेळी शहर जिल्हाध्यक्ष रणजित भोसले, वाल्मीक मराठे, कुणाल पवार, महेंद्र शिरसाठ, राजेंद्र शिरसाठ, मनोज कोळेकर, जमीर शेख, प्रकाश जाधव आदींना पोलिसांनी ताब्यात घेऊन सुटका केली.
महापालिकेत कोरोना योद्धांचा सत्कार
कोरोना काळात वैद्यकीय तसेच समाज कार्यात कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील कोरोना योद्धांचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी महापौर चंद्रकांत सोनार, खासदार डॉ.सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल, आमदार फारूख शाह आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
वाल्मीकी रामायण-किष्किंधाकांड ग्रंथाचे प्रकाशन
समर्थ वाग्देवता मंदिर येथील नानासाहेब देव सभागृहात संत रामदास स्वामी लिखित वाल्मीकी रामायण-किष्किंधाकांड या ग्रंथाच्या प्रकाशन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते झोले. यावेळी राजभवनाचे प्रधान सचिव संतोष कुमार, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर, उपसचिव श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी संजय यादव, पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी., उत्तर महाराष्ट्राचे कुलगुरू डॉ.पी.पी. पाटील, समर्थ वाग्देवता मंदिराचे अध्यक्ष शरद कुबेर, समर्थ वंशज भूषण स्वामी, कार्याध्यक्ष देवेंद्र डोंगरे आदी उपस्थित होते. समर्थ वाग्देवता संस्थेच्या कार्यासाठी पाच लाख रुपयांचा निधी देण्यात येईल, असे आश्वासन कोश्यारी यांनी दिले.