धुळे : शहरासह जिल्ह्यात अवैध हत्यारे बाळगणाऱ्यांच्या विरुध्द पोलिसांनी धडक कारवाई सुरु केली आहे़ रविवारी धुळ्यात आणि शिरपूर तालुक्यात गावठी पिस्तुलांसह दोघांना पकडण्यात आल्यानंतर सोमवारी रात्री मोहाडी पोलिसांनी सिल्लोड येथील एका तरुणाला गावठी पिस्तुल विक्री करताना रंगेहात पकडले़ त्याच्याकडून पिस्तुलसह ३ जीवंत काडतूस आणि दुचाकी असा एकूण ३० हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला़चाळीसगाव रोडवरील सिमेंट गोडावून परिसरात एक तरुण गावठी पिस्तूल विक्री करण्याच्या उद्देशाने येणार असल्याची गोपनीय माहिती मोहाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरु यांना गोपनीय माहिती मिळाली होती़ त्यानुसार, २ नोव्हेंबर रोजी रात्री मोहाडी पोलिसांच्या पथकाने सापळा लावला़ रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास चाळीसगाव रोडवरील सिमेंट गोडावूनसमोर सोमीनाथ भगवान लाड (२८, रा़ म्हसोबा गल्ली, सिल्लोड, जि़ औरंगाबाद) हा तरुण संशयास्पदरित्या उभा असल्याचे दिसून आले़ त्याची चौकशी केली असता त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले़ त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे १५ हजार रुपये किंमतीची देशी बनावटीची पिस्तूल, ३६० रुपयांचे ३ जीवंत काडतूस, १५ हजार रुपये किंमतीची एमएच २० एफजे ५९७३ क्रमांकाची दुचाकी असा एकूण ३० हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ सोमीनाथ लाड या संशयित तरुणाला अटक करण्यात आली़ याप्रकरणी पोलीस कर्मचारी श्याम काळे यांनी फिर्याद दाखल केल्याने विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला़पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरु यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक एम़ आय़ मिर्झा, पोलीस कर्मचारी प्रभाकर ब्राह्मणे, श्याम काळे, गणेश भामरे, कांतीलाल शिरसाठ, जितेंद्र वाघ, सचिन वाघ, अजय दाभाडे, धीरज गवते यांनी ही कारवाई केली़
धुळ्यातील मोहाडी पोलिसांनी सिल्लोडच्या एकाला गावठी पिस्तुलसह रंगेहात पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 22:35 IST