कोरोनाकाळात फ्रंटलाइन वर्करसह सर्वांनी चांगले काम केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश व आम्ही सुरक्षित आहोत. अनेक जण सत्तेवर आलेत, मात्र कोणीही आदिवासींना न्याय मिळवून दिला नाही. तो मोदी सरकारने माझ्यासारख्या आदिवासी महिलेला मंत्री बनवून जनतेची सेवा करण्याची संधी दिली आहे. खान्देशात आरोग्यसेवा बळकट करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी चिमठाणे येथे आलेल्या जनआशीर्वाद यात्रेप्रसंगी सांगितले. यावेळी गावातील १७ माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला.
चिमठाणे चौफुलीवरील आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानी माजी मंत्री आमदार जयकुमार रावल होते. तर, प्रमुख पाहुणे माजी केंद्रीय राज्यमंत्री खा.डॉ. सुभाष भामरे, माजी मंत्री आमदार गिरीश महाजन, रॅलीचे प्रमुख अशोक उळके, जि.प. अध्यक्ष तुषार रंधे, आमदार कांशिराम पावरा, राज्य उपाध्यक्ष बबन चौधरी, आमदार राजेश पाडवी, लक्ष्मण सावजी, जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, कामराज निकम, जि.प. उपाध्यक्षा कुसुम निकम, पं.स. सभापती वैशाली सोनवणे, उपसभापती नारायणसिंग गिरासे, जिल्हा सरचिटणीस डी.एस. गिरासे, जि.प. सदस्य वीरेंद्रसिंग गिरासे आदींसह चिमठाणे परिसरातील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चिमठाणे येथील कार्यक्रमाला शुक्रवारी रात्री उशिरा मंत्री डॉ. भारती पवार दाखल झाल्या. यावेळी डॉ. पवार यांचा रोहिणी भूपेंद्र गिरासे यांनी औक्षण केले. तर, जि.प. सदस्य वीरेंद्रसिंग गिरासे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी शिंदखेडा तालुका भाजप आदिवासी आघाडीतर्फे दीपक मोरे, अनिल गायकवाड, प्रकाश भिल, पांडू मोरे, अण्णा मालचे, राजाराम मोरे, नामदेव भिल, भाऊसाहेब भिल यांनी नागरी सत्कार केला. यानंतर तालुक्यातून आलेल्या १७ सेवानिवृत्त माजी सैनिकांचा सत्कार डॉ. भारती पवार यांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन करून आभार डी.एस. गिरासे यांनी मानले.