- भूषण चिंचोरे
धुळे - कोरोनाच्या निर्बंधांमुळे सण - उत्सव साजरा करण्यावर मर्यादा आल्या आहेत. श्रावण महिन्यात येणाऱ्या सणांची यादी मोठी आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लोकप्रतिनिधींना या सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी जनतेत जाता आले नाही. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. रक्षाबंधन, नागपंचमी, श्रीकृष्ण जन्माष्टमी आदी सणांविषयीच्या पोस्ट त्यांनी फेसबुक, ट्विटर आदी माध्यमांवर टाकल्या आहेत, तर काहीजणांनी आपले फोटोही शेअर केले आहेत.
खासदारांच्या शुभेच्छा
खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी श्रावण महिन्यातील सर्वच सणांच्या ट्विटर व फेसबुकवरून शुभेच्छा दिल्या आहेत, तसेच पॅराऑलिम्पिक, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मन की बात या कार्यक्रमाचीही माहिती त्यांनी सोशल मीडियावरून दिली आहे.
आ. कुणाल पाटील यांनी शेअर केले फोटो
धुळे ग्रामीण मतदारसंघाचे आमदार कुणाल पाटील सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. त्यांनी रक्षाबंधन साजरा करतानाचे फोटो फेसबुकवर शेअर केले आहेत, तसेच इतर सणांच्याही शुभेच्छा दिल्या आहेत.
आ. अमरिशभाई पटेल
आ. अमरिशभाई पटेल यांना फेसबुकवर टॅग करीत त्यांच्या समर्थकांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या फेसबुक पेजवरून रक्षाबंधन, नागपंचमी आदी सणांच्या शुभेच्छा त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिल्या आहेत.
स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा
साक्री विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मंजुळा गावित यांनी स्वातंत्र्यदिनाच्या व आदिवासी दिनाच्या फेसबुक पेजवरून शुभेच्छा दिल्या आहेत, तसेच मतदारसंघातील विकासाबाबत वेळोवेळी माहिती दिली आहे.
कारगिल विजय दिनाच्या शुभेच्छा
धुळे शहराचे आमदार यांनी फेसबुकच्या माध्यमातून कारगिल विजय दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत, तसेच शहरातील विविध विकासकामे व भेटीचे फोटो शेअर केले आहेत.
आ. रावलांचे अनोखे रक्षाबंधन
शिंदखेडा मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावल सोशल मीडिया हाताळण्यात आघाडीवर आहेत. त्यांनी मतदारसंघातील महिलांकडून राखी बांधतानाच फोटो टाकून अनोखे रक्षाबंधन अशा ओळीची लिहिल्या आहेत.
आ. पावरा यांचा थेट शुभेच्छांवरच भर
शिरपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशीराम पावरा हे समाजमाध्यमांवर फारसे सक्रिय नाहीत. विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी एकही पोस्ट टाकलेली नाही. त्यांनी कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष शुभेच्छा देणेच पसंत केले आहे.