राज्य शासनाचा सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना ९० टक्के अनुदानावर ९ ते १८ अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने (कल्टिव्हेटर, रोटाव्हेटर व ट्रेलर) यांच्या लाभाची हस्तांतरण रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या योजनेच्या अटी व शती अशा : ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करता येतील. मात्र, त्यांची किंमत शासकीय अनुदानापेक्षा (रुपये ३.१५ लाख) जास्त असल्यास कमाल अनुज्ञेय अनुदानाव्यतिरिक्त जादाची रक्कम बचत गटांना स्वतः खर्च करावी लागेल. मिनी ट्रॅक्टर व त्याच्या उपसाधनांची कमाल किंमत रु.३.५० लाख राहील, त्यामध्ये ९० टक्के म्हणजेच रुपये ३.१५ लाख शासकीय अनुदान, स्वयंसहायता बचत गटांचा हिस्सा १० टक्के म्हणजेच रुपये ३५ हजार एवढा असेल. या योजनेंतर्गत लाभार्थी बचत गटांची निवड झाल्यानंतर बचत गटाने मान्यताप्राप्त उत्पादकाकडून मिनी ट्रॅक्टर, ट्रेलर व त्याची उपसाधने शासनाने निर्धारित केलेल्या किमतीपर्यंत खरेदी करावीत. स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर/ट्रेलर व त्याची उपसाधने खरेदी केल्याची पावती सादर केल्यानंतर व खातरजमा करून लाभार्थी बचत गटाला शासकीय अनुदानाचा ५० टक्के हप्ता त्यांच्या बचत गटांच्या आधार संलग्न खात्यावर जमा करण्यात येईल. उर्वरित ५० टक्के अनुदान मिनी ट्रॅक्टर, ट्रेलर व त्याच्या उपसाधनांची प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडे नोंद झाल्यानंतर बचत गटांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल किंवा स्वयंसहायता बचत गटाने मिनी ट्रॅक्टर, ट्रेलर व त्याची उपसाधनांची प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडे नोंद केल्याचे पुरावे सादर केल्यास १०० टक्के अनुदान स्वयंसहायता बचत गटांच्या आधार संलग्न खात्यावर जमा करण्यात येईल. या योजनेंतर्गत ३० जानेवारीपर्यंत प्रस्ताव स्वीकारण्यात येतील. अंतिम दिनांकानंतर प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत. या योजनेचा विहीत नमुन्यातील अर्ज, तसेच अधिक माहितीसाठी स्वयंसहायता बचत गटांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण येथे संपर्क साधावा.
अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकातील बचत गटांना अनुदानावर मिनी ट्रॅक्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:36 IST