धुळे जिल्ह्यात एकूण २१८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या होत्या, त्यापैकी माघारीअंति ३६ बिनविरोध झाल्यामुळे उर्वरित १८२ ग्रामपंचायतींमध्ये मतदान घेण्यात आले़ शिरपूर तालुक्यात ३४ ग्रामपंचायतींपैकी ६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यामुळे उर्वरित २८ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक घेण्यात आली़ यात राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत सदस्य संख्येनुसार १५ ते ७५ हजार रुपये खर्च करण्यास मान्यता दिली होती. परंतु, आयोगाने दिलेल्या खर्चाच्या मर्यादा जिल्ह्यातील बहुतेक सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी ओलांडल्या आहेत. या तालुक्यातील दहिवद, सावळदे, विखरण, मांडळ, भाटपुरा, होळ आदी मोठ्या ग्रामपंचायतींच्या सदस्यांचा निवडणूक खर्च लाखोंच्या घरात गेला आहे़
दहिवद येथे एका पॅनलतर्फे मतदानाच्या पूर्वसंध्येला काही मतदारांना प्रत्येकी ३ हजार रुपये देण्यात आल्यानंतर पुन्हा मतदानाच्या भल्या पहाटे २ हजार रुपये देऊन ज्वारी हातात घेऊन शपथ घ्यायला सांगून मतदान करण्यास प्रवृत्त केले़ बहुतांश मतदारांना १ ते ३ हजारांपर्यंत पॅनलप्रमुखांनी पैशाचे वाटप केले़
सावळदे येथे प्रति मतदार ३०० रूपयांसह साडी व ड्रेसचे वाटप करण्यात आले. एका उमेदवाराने तर चक्क १५०० रुपये दिले तर नवीनच राजकारणात शिरकाव केलेल्या एकाने १ हजार रुपये मतदारांना दिलेत़ अधिकाधिक मतदारांना आमिषे देऊन या ठिकाणी मते पदरात पाडण्याचा प्रयत्न शेवटपर्यंत दिसून आला़
मांडळ येथेही १ हजारापासून २ हजारांपर्यंत मतदारांना रोकड देऊन खुश करण्यात आले़ याशिवाय भाटपुरा, विखरण, होळ, शिंगावे, जुने भामपूर, बलकुवे आदी मोठ्या गावांमध्ये पैशांचा महापूर वाहिला़ संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर साड्या, ड्रेस, विविध प्रकारच्या वाणांचे मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आले़ निवडणुका जाहीर झाल्यापासून उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात मिष्टान्न व मांसाहार जेवणाच्या रोज पंगती उठवल्या जात होत्या़ मतदानाच्या बहुतेक सर्व मोठ्या व चुरशीच्या ग्रामपंचायतीत अनेक सदस्यांनी थेट मतदारांना पैसे वाटप करण्यात आले़ एका मतासाठी ३०० रुपयांपासून ५००, १०००, १५००, २००० तर काहींना ३ हजार रुपयांचे देखील वाटप करण्यात आल्याची चर्चा जोरात सुरू आहे. तसेच मुंबई, पुणे, नाशिक, इंदोर, सुरत येथे नोकरीनिमित्त गेलेल्या मतदारांना गावाला घेऊन येणे व पुन्हा सोडण्यासाठी देखील विशेष सोयी करण्यात आल्या होत्या़
दहिवद येथे एका ग्रामपंचायत उमेदवाराने तब्बल एका मतदानाला ५ हजारांपर्यंत वाटप केल्याची जोरदार चर्चा गावाच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे़ सावळदे येथे कपड्यांसह रोख रक्कम दिल्याची चर्चिले जात आहे.