प्रादेशिक परिवहन कार्यालयातील वरिष्ठ लिपीक दिलीप शिरसाठ यांनी सप्टेंबर २०२० ते जानेवारी २०२१ या कालावधीत महाराष्ट्र ते मध्यप्रदेश राज्यात टप्पा वाहतूक करणाऱ्या वाहनांचा प्रवासी कर ७ लाख ६० हजार ४२० रुपये इतकी रक्कम स्वत: पावती पुस्तके वापरुन स्विकारली. परंतु जमा झालेला महसूल हा शासनाकडे जमा केला नाही. अनधिकृत गैरहजर राहून कामकाजाचे आदेश नसताना गैरवापर करण्यात आला. पावती पुस्तके व कॅशबुक घरी बाळगून अनधिकृतपणे शासकीय महसूल गोळा केला. जमा झालेला महसूल हा शासनाकडे जमा न करता स्वत:कडे ठेवला. तसेच कर प्राधिकारी यांची मान्यता न घेता वाहनांना प्रवासी कर भरणा प्रमाणपत्रे जारी करणे ही बाब गंभीर असून त्याची प्रादेशिक परिवहन विभागाकडून दखल घेण्यात आली आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ च्या नियम ४ च्या पोटनियम (१) (अ) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन धुळ्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील वरिष्ठ लिपिक दिलीप शिरसाठ यांना निलंबित करण्याचे आदेश परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी पारीत केले आहेत. निलंबनाचा आदेश अंमलात असे पर्यंत दिलीप शिरसाठ यांचे मुख्यालय जळगाव येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय राहील. जळगाव येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या पूर्व परवानगी शिवाय त्यांना त्यांचे मुख्यालय सोडता येणार नाही असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
प्रवासी कराची गैरवसुली वरिष्ठ लिपीकाला भोवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:34 IST