कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत असल्याने लस घेण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे; मात्र पाच दिवसांपासून म्हसदी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लस उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांना लस घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात हेलपाटे मारावे लागत आहेत. या लसीकरण केंद्रासाठी दररोज किती डोस दिले, कोणत्या दिवशी लस उपलब्ध होणार आहे, अशी माहिती ग्रामस्थांपर्यंत पोहोचत नसल्याने दररोज लसीकरण केंद्राचे उंबरठे झिजवावे लागत आहेत, त्यामुळे लस उपलब्ध आहे की नाही? याची माहिती आरोग्य विभागाने सोशल मीडिया व प्रसिद्धी माध्यमातून ग्रामस्थापर्यंत पोहोचवावी, तसेच गावनिहाय लसीकरण शिबिर घ्यावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
लसीकरण केंद्रावर गर्दी टाळण्यासाठी व वयोवृद्धांच्या सोयीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राने गावनिहाय लसीकरण शिबिर घ्यावे.
उपसरपंच चंद्रकांत देवरे, म्हसदी.
जिल्हाभरातच लसीचा तुटवडा निर्माण झालेला आहे. त्यामुळे वरिष्ठ कार्यालयाकडून लसीचे डोस उपलब्ध होताच लसीकरण सुरळीत सुरू करण्यात येईल.
डॉ. महेश ढवळे, वैद्यकीय अधिकारी म्हसदी.