शिरपूर तालुक्यात एकूण ३४ ग्रामपंचायतींची निवडणूक लागली होती. मात्र माघारीअंती घोडसगाव, पिंपळे, वाठोडे, भावेर, असली, हिंगोणीपाडा या ६ ग्रामपंचायतींसह ६१ ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध झाले आहेत तसेच बाळदे, भटाणे, बोरगाव, भोरखेडा व बाभुळदे अशा ५ ग्रामपंचायतींमध्ये केवळ एका जागेसाठी निवडणूक लागली असून, उर्वरित सर्वच्या सर्व जागा माघारीअंती बिनविरोध झाल्या आहेत.
बलकुवे, कुवे, चाकडू, होळ, उप्परपिंड, दहिवद, नटवाडे, जामन्यापाडा, गरताड, भाटपुरा, साकवद, जुने भामपूर, मांडळ, वरूळ, विखरण, शिंगावे, शेमल्या या ठिकाणी आमने-सामने लढती रंगल्या आहे. शिरपूर तालुक्याचा इतिहास पाहता तालुक्याचे भगीरथ अमरिशभाई पटेल ज्या पक्षाकडे त्या पक्षाचे वर्चस्व असते, हे गत निवडणुकीतसुद्धा सिद्ध झाले आहे. त्यामुळे या तालुक्यात अमरिशभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली भाजपची सत्ता एकहाती असल्याचे चित्र दिसत असले तरी गावपातळीवर भाजपच्याच दोन गटांत बहुतांश गावांत नातीगोती, हितसंबंध व कामाच्या माध्यमातून कोणती ग्रामपंचायत कोणाच्या ताब्यात जाणार हे मात्र सुज्ञ मतदार ठरवणार आहेत. विशेषत: या निवडणुकीत अन्य पक्षांचे अस्तित्व कुठेच दिसत नाही. दरम्यान, आपापल्या गावात आपली प्रतिष्ठा टिकवून ठेवण्यासाठी प्रचार करीत असल्याचे दिसत आहे. या चुरशीच्या निवडणुकांमध्ये प्रामुख्याने दहिवद, होळ, मांडळ, भाटपुरा, विखरण येथे या गावांमधील गावपुढाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.