धुळे : जिल्ह्यात कोरोनाचा कहर पुन्हा सुरू झाला आहे. रूग्णवाढीच्या दुसऱ्या टप्प्यातही धुळे शहर सर्वात मोठे हॉटस्पाॅट ठरले आहे. १५ ते १७ मार्च या कालावधीत जिल्ह्यातील १ हजार ३७४ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यापैकी तब्बल ५१ टक्के रुग्ण धुळे शहरात आढळले आहेत. शहरातील ६९८ रुग्णांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
मागील वर्षी जिल्ह्यात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव धुळे शहरात झाला होता. रुग्ण आढळण्यासोबतच मृतांची संख्याही जास्त होती. आता रुग्णवाढीच्या दुसऱ्या टप्प्यातही शहरात कोरोनाचा कहर सुरू झाला आहे. शहरातील सर्वच भागात रुग्ण आढळत आहेत. साक्री रोड, देवपूर, वडीभोकर रोड, गोंदूर रोड या भागांचा त्यात समावेश आहे. तरीही बाजारातील गर्दी मात्र कमी होताना दिसून येत नाही. तसेच कोरोनाच्या प्रतिबंधात्मक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होत आहे. नागरिकांची बेफिकिरी थांबली तरच कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येऊ शकतो.
दोघांचा मृत्यू
- या तीन दिवसांच्या कालावधीत दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. खाजगी रुग्णालय व हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असताना प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दोन्हीही रुग्ण शहरातील होते. त्यात चौधरी वाडा येथील ७५ वर्षीय रुग्णाचा समावेश आहे.
सलग तीन दिवस २०० पेक्षा अधिक रुग्ण आढळले -
धुळे शहरात सलग तीन दिवस २०० पेक्षा अधिक रुग्ण आढळले आहेत. १५ मार्च रोजी जिल्ह्यातील ५१५ रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यात धुळे शहरातील २५२ रुग्णांचा समावेश होता. तसेच १६ रोजी आढळलेल्या ४५३ रुग्णांमध्ये शहरातील २३८ रुग्णांचा समावेश होता. १७ मार्च रोजी ४०६ अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यात शहरातील २०८ जणांचा समावेश होता. दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा घट्ट होताना दिसून येत असून प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.