जिल्ह्यात २१८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या. मात्र माघारीपर्यंत ३६ ग्रामंचायती बिनविरोध झाल्याने, आता फक्त १८२ ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे.
ग्रामपंचायती निवडणुका या पक्षीय चिन्हावर लढविल्या जात नाही, हे जरी वास्तव असले तरी प्रत्येक्ष पक्षाशी निगडीत असलेले उमेदवारच या निवडणुकीत उतरत असतात.
राज्यात भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी राज्य विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी महाविकास आघाडी स्थापन करून सत्ता स्थापन केली. या महाविकास आघाडीला राज्यातील काही निवडणुकांमध्ये चांगले यश मिळालेले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीतही असा प्रयोग राबविला जाईल, अशी अपेक्षा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोकांना होता. मात्र निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्यात आला असतानाही शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी हे तीनही पक्षा एकत्र आल्याचे अद्याप दिसून आलेले नाही. त्यामुळे मतांची विभागणी होऊन त्याचा फायदा दुसऱ्याला होणार नाही ना? अशीही शंका उपस्थित होऊ लागलेली आहे.
आता मतदानाला अवघे काही दिवस बाकी आहेत. सर्वच उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतलेली आहे. ग्रामस्थांनी मते कोणत्या पक्षाच्या उमेदवाराच्या पारड्यात टाकले, ते निकालानंतर स्पष्ट होणार आहे. मात्र या गावपातळीच्या निवडणुकीतही भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाल्यास. एक नवीन समीकरण जुळून येऊ शकते. मात्र सर्व काही ग्रामीण भागातील स्थितीवर अवलंबून राहणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुकी या पक्षीय पातळीऐवजी स्थानिक पातळीवरच लढविल्या जात असतात. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा निश्चितच फायदा होणार आहे. सत्ता स्थापनेच्या वेळी आघाडीचे नेते एकत्र येतील.
- श्याम सनेर, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस
ग्रामपंचायत निवडणुकीत जास्तीत जास्त शिवसेनेचे पॅनल देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या निवडणुकीत भाऊबंदकी, समाजाचा विषय असतो. निवडणूक निकालानंतर महाविकास आघाडीचा प्रयत्न होऊ शकतो.
- हिलाल माळी,
जिल्हाध्यक्ष, शिवसेना
ग्रामपंचायत निवडणूक ही पक्षीय चिन्हावर लढविली जात नाही. मात्र प्रत्येक गावात त्या-त्या पक्षाच्या विचारसणीचे लोक गावात असतात. जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीचे सरपंच, उपसरपंच विराजमान कसे होतील यासाठी तीनही पक्षाचे प्रयत्न करतील.
- किरण शिंदे,
जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी